सिमला - विधानसभेत जवळपास दोन तृतियांश जागा मिळवून भाजपा हिमाचल प्रदेशात सत्तेत आली आहे. वीरभद्र सिंह आणि प्रेमकुमार धुमल यांनी दर पाच वर्षांनी मुख्यमंत्री होण्याची परंपरा या निवडणुकीत मात्र खंडीत झाली आहे. प्रेमकुमार धुमल यांना निवडणुकीच्यावेळेस भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले गेले असले तरी धुमल यांच्याच पराभवामुळे भाजपासमोर नवा पेच निर्माण झाला. आता जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक करुन भाजपाने धुमल यांच्या तुलनेत तरुण पण हिमाचल भाजपातील ज्येष्ठ नेत्यास संधी दिली आहे.
जयराम ठाकूर हे भाजपाचे मंडी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ठाकूर यांच्या रुपाने भाजपाने पुन्हा रजपूत व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी संधी दिली आहे. अत्यंत तरुण वयातच ठाकूर अभाविपचे कार्यकर्ते म्हणून काम करु लागले. काही दिवस जम्मू आणि काश्मीरमध्ये अभाविपचे काम केल्यावर १९९३ साली वयाच्या २८ व्या वर्षी ते विधानसभेची पहिली निवडणूक लढले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी १९९८ साली विधानसभेत प्रथमच प्रवेश केला, त्यानंतर ते सतत विजयी होत गेले. प्रेमकुमार धुमल यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांची जबाबदारीही सांभाळली होती. ठाकूर यांनी २०१३ साली मंडी लोकसभा मतदारसंघातून पोट निवडणूक लढवली होती मात्र तत्कालीन मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह यांचा विजय झाल्यामुळे त्यांना लोकसभेत जाता आले नाही. असे असले तरी ठाकूर यांची मंडी विभागावर पकड कायम राहिली. मंडी विभागात १० पैकी ९ जागा भाजपाने जिंकल्या आहेत.
जयराम ठाकूर हे केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या निवडीमुळे नड्डा यांचे हिमाचल भाजपातील स्थान बळकट होणार असे सांगण्यात येते तर प्रेमकुमार धुमल व अनुराग ठाकूर यांच्या हिमाचलमधील स्थानास धक्का पोहोचू शकतो.