घाबरतोय कोण? मैदानात दोन हात करू, अमित शहा यांनी राहुल गांधींना दिले आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 10:44 AM2023-04-08T10:44:22+5:302023-04-08T10:44:47+5:30
संसदेचे कामकाज विस्कळीत करणाऱ्या विरोधकांना देश माफ करणार नाही!
कौशांबी (उत्तर प्रदेश) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व अपात्र ठरविल्याबद्दल संसदेचे कामकाज विस्कळीत करणाऱ्या विरोधकांना देश माफ करणार नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना खुले आव्हानही दिले. कौशांबी महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते म्हणाले, देशाच्या कोणत्याही नेत्याने परदेशात देशाचा अपमान करावा का?.
राहुल गांधींवर निशाणा साधत ‘‘घाबरतोय कोण? मैदान खुले आहे. भारतात कोणतेही मैदान तुम्ही ठरवा, दोन-दोन हात करायला भाजपवाले तयार आहेत,” असे आव्हानही त्यांनी दिले. पुन्हा एकदा मोदीजी ३०० पेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करणार आहेत,” असा दावा त्यांनी केला.
अमित शाह म्हणाले...
- जेव्हा-जेव्हा मोदीजींना शिव्या दिल्या जातात, तेव्हा जनतेने या शिव्या अधिक ताकदीने कमळाच्या चिखलात फुलवल्या आहेत.
- काँग्रेसचे लोक म्हणतात की लोकशाही धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात नाही, तुमचे कुटुंब धोक्यात आहे. कौटुंबिक राजकारण धोक्यात आहे.
असे इतिहासात कधीच घडले नाही...
विरोधकांवर निशाणा साधत शाह म्हणाले, “देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सत्र चर्चेविना संपले, असे स्वातंत्र्याच्या इतिहासात कधीच घडले नव्हते. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अधिवेशन चालू दिले नाही, त्याचे कारण म्हणजे राहुल गांधींना संसदेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरविणे.आता या मुद्द्यावर काळे कपडे घातलेल्या काँग्रेसवाल्यांनी संपूर्ण संसद बंद पाडली.’’
काँग्रेस म्हणते...
‘भारत जोडो’च्या माध्यमातून राहुल गांधींनी राष्ट्रीय स्तरावर एक शक्तिशाली वातावरण तयार केले जे परिवर्तनकारी होते. हताश भाजप त्यावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. यात निष्पक्ष असावे अशी अपेक्षा असलेल्या उच्च पदांवरील काही मान्यवरांचाही समावेश आहे. -जयराम रमेश, काँग्रेस सरचिटणीस