मुंबई - औरंगजेबाच्या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरे आणि भाजपा आमनेसामने आलेले दिसत आहेत. काल उद्धव ठाकरें यांनी भाजपाच्या नेत्यांच्या राजकारणाची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर आता भाजपा नेत्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आघाडी उघडली आहे. त्यात आता ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून, बाळासाहेबांच्या बाकी वंशजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण होता?, असा सवाल विचारला आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले की, मनसेचे सहा नगरसेवक पळविणारा औरंग्या कोण होता? राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण होता?बाळासाहेबांच्या बाकी वंशजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण होता? आता कोठडी दिसायला लागली तर नाती आठवली! अशी कपटी वृत्तीचा खऱ्या औरंग्या कोण? अशी विचारणा नितेश राणे यांनी केली.
दरम्यान, नितेश राणे यांनी आज सकाळीही उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मुलाची दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये जाणार असल्याने बाप म्हणून उद्धव ठाकरे संतापलेत. हा राग ते भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढतायेत . उद्धव ठाकरे जे स्वत:च्या वडिलांचे, स्वत:च्या धर्माचे, स्वत:च्या सख्ख्या भावाचे झाले नाहीत ते देवेंद्र फडणवीस यांना नाव ठेवत असेल तर नमकहराम कुणी नाही. देवेंद्र फडणवीसांनी सत्ता काळात भावाप्रमाणे त्यांना सांभाळले. उद्धव ठाकरेंचे मूळ दुखणं भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस नाही तर आता ज्या कारवाया होतायेत त्या रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर यांच्यावर होतायेत. बाप म्हणून उद्धव ठाकरेंना कळालं आहे, माझा मुलगा जेलमध्ये जाणार आहे. माझ्या मुलाची दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये होणार आहे त्याचा राग कुणावर काढायचा तर तो भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढतायेत. कोविड काळात भ्रष्टाचार करायला आम्ही सांगितला होता का? मुलगा जेलमध्ये जाणार ते सहन होत नसल्याने ही कारवाई थांबवू शकत नाही याचा राग उद्धव ठाकरे भाजपा-देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढताहेत, असा टोला लगावला होता.