कोण आहेत बाबा बोखनाग? त्यांचा बोगदा दुर्घटनेशी काय संबंध? ग्रामस्थांनी केला मोठा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:45 PM2023-11-27T12:45:42+5:302023-11-27T12:49:54+5:30
Uttarkashi Tunnel Rescue : जाणून घ्या कोण आहेत बाबा बौखनाग...!
उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगदा दुर्घटननेचा आजचा सोळावा दिवस आहे. मात्र या बोगद्यात अडकलेल्या मजुरांना काढण्यात अद्यापही यश आलेले नाही. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी दिवस-रात्र एक केली जात आहे. मात्र रेस्क्यूमध्ये वारंवार अडथळे येत आहेत. यातच आता, बोगदा तयार केला जात असल्याने बाबा नाराज झाले आहेत आणि यामुळेच रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी होण्यात अडथळा येत आहे, असा दावा येथील ग्रामस्थ करत आहेत.
बौखनाग देवता नाराज झाले असल्याने, बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या रेस्क्यूत वारंवार अडथळे येत आहेत. एवढेच नाही तर, जोवर बाबा बौखनाग यांचे पक्के मंदीर बांधले जाणार नाही आणि त्यांची विधीवत पद्धतीने पूजा-अर्चा होणार नाही, तोवर रेस्क्यू होऊ शकणार नाही, असे येथील ग्रामस्थांचे मत आहे.
जाणून घ्या कोण आहेत बाबा बौखनाग -
उत्तरकाशीच्या रेडिटॉप भागात बाबा बोखनाग यांचे मंदिर आहे. बाबा बौखनाग हे येथील परिसराचे संरक्षक मानले जातात. पहाडी भागात असलेल्या त्यांच्या मंदिरात परिसरात दरवर्षी यात्रा भरते. त्यांच्याप्रति गावकऱ्यांमध्ये प्रचंड आस्था आहे. येथील प्रत्येक गावात बाबांचे मंदिर आहे. महत्वाचे म्हणजे, या संपूर्ण परिसराचे संरक्षण तेच करतात. तसेच, बाबा बौखनाग यांचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.
येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, बाबा बौखनाग यांची उत्पत्ती सापाच्या रूपात झाली आहे. मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण टिहरी येथील सेम मुखेम येथून येथे आले होते. यामुळे सेममुखेम आणि बाबा बोखनाग यांच्या मंदिरात दरवर्षी यात्रा भरते. हे मंदिर ज्या ठिकाणी उभे आहे, त्याच्या बरोबर खालूनच बोगदा जात आहे. अशात, त्यांच्या शेपटीखालून बोगदा जाणे हितकारक असू शकत नाही.