काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांना आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वायनाडमधून प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे. सुरेंद्रन मैदानात उरल्याने राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात. ते यावेळीही वायनाडमधूनच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. याशिवाय, अमेठीतूनही निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र भाजपने वायनाडसाठी घोषित केलेल्या उमेदवाराची चर्चा अधिक आहे. तर जाणून घेऊयात, कोण आहेत केरळ भाजपाध्यक्ष? का सुरू आहे त्यांची एवढी चर्चा...? केरळ भाजपाध्यक्ष के. सुरेंद्रन -- के. सुरेंद्रन हे नॉर्थ केरळमधील एक मोठे नेते आहेत. ते 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. - गेल्यावेळी त्यांनी पथानामथिट्टा (Pathanamthitta) या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.- 2018 मध्ये सबरीमाला आंदोलनावेळी सुरेंद्रन यांना अटकही करण्यात आली होती. त्यावेळी ते एका महिन्याहूनही अधिक काळ जेलमध्ये होते.- के. सुरेंद्रन यांनी 2021 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर निवडणूक लढली होती. मात्र या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला.- यावेळी सुरेंद्रन संपूर्ण तयारीत आहेत. उमेदवारी घोषित झाल्यानंतर, त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत आणि राहुल गांधींचा उल्लेख करत एक ट्विट केले आहे. त्यांनी एक्सवर लिहिले, 'मला हे सांगताना आनंद होत आहे की, भाजपने वायनाडमध्ये इंडी अलायन्सचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात एनडीएचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा केली.'
वायनाडमध्ये अशी होणार फाइट -विरोधी पक्षांनी I.N.D.I.A. नावाने आघाडी तयार केली असली तरी, काँग्रेस आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेला सीपीआय या दोघांनीही वायनाडमधून आपापले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. सीपीआयने ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे राहुल गांधींच्या मतांमध्ये विभाजनाचा धोका आहे. महत्वाचे म्हणजे, वायनाड हा रायबरेली आणि अमेठीप्रमाणेच काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जातो. येथे गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे.
राहुल गांधी यांनी 2019 च्या निवडणुकीत वायनाडमध्ये सीपीआयच्या उमेदवाराचा 4.31 लाख मतांनी पराभाव केला होता. यावेळी, भाजपच्या उमेदवाराला केवळ 78,000 मतेच मिळाली होती आणि तो तिसऱ्या स्थानावर होता. मात्र यावेळी सुरेंद्रन हे राहुल गांधी यांना कडवे आव्हान देऊ शकतात, अशी आशा भाजपला आहे.