सूरत - गुजरातमधील भाजपच्या रेकॉर्ड ब्रेक विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील. प्रचार सुरू करतानाच भाजपने १५१ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे साध्य करण्यासाठी पाटील यांनी पन्ना कमिट्या मजबूत करण्यावर भर दिला. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी अनेक निर्णय घेत पक्षाची संघटना मजबूत करण्यावर भर दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली.
सी. आर. पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील पिंपरी अकाराउत या गावात एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण दक्षिण गुजरातमध्ये झाले. १९७५ साली ते गुजरात पोलिसात भरती झाले. काही वर्षांनी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन समाजकारणास वाहून घेतले. पोलिसांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेतला. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
अहमदाबादचा गड भाजप अधिक मजबूत करील, असे भाकीत ‘लोकमत’ने वर्तविले होते. अहमदाबादेत शहर आणि जिल्हा मिळून असलेल्या २१ पैकी १९ जागा जिंकून पक्षाने जोरदार मुसंडी मारली. दर्यापूर, दाणीलिमडा, साणंद आणि बापूनगरची जागाही काँग्रेसने गमावली. आणंदच्या अमूल डेअरीचे अध्यक्ष रामसिंग परमार यांचे पुत्र योगेंद्रसिंह हे बाजूच्या खेडा जिल्ह्यातील ठासरा मतदारसंघात भाजपकडून जिंकले.