नवी दिल्ली – आयआयटी दिल्लीतील एका प्रोफेसरनं केलेल्या विधानावरून सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात येत आहे. एका परदेशी न्यूज चॅनेलला प्रोफेसरने ही मुलाखत दिली. भविष्यात भारतात हिंदुत्व राहणार नाही असं विधान प्रोफेसर दिव्या द्विवेदी यांनी केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका परदेशी न्यूज चॅनेलवर जी-२० शिखर संमेलनावरील डिबेटमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.
आयआयटी दिल्लीतील प्रोफेसर दिव्या द्विवेदी यांनी फ्रान्स २४ ला म्हटलं की, दोन भारत आहेत - एक म्हणजे भूतकाळातील भारत, बहुसंख्य लोकांवर अत्याचार करणारी वर्णद्वेषी जातिव्यवस्था... आणि मग भविष्याचा भारत आहे, ज्यामध्ये जातीचे अत्याचार आणि हिंदुत्व असणार नाही. समतावादी भारत असेल. हाच तो भारत आहे जो अजून दिसला नाही पण पुढे येण्यास आतुर आहे. त्यांची मुलाखत अनेकांनी व्हायरल केली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांचे लोक संतापले आहेत.
फ्रान्स २४ च्या पत्रकाराने भारताच्या आर्थिक विकासाची चर्चा करताना एका रिक्षाचालकाचे उदाहरण दिले. ज्याला तंत्रज्ञानामुळे फायदा झाला, तेव्हा दिव्या द्विवेदी म्हणाल्या की, अशाप्रकारचे किस्से माध्यमांमध्ये आहेत. '३०० वर्षांहून अधिक काळ, भारताला वर्णद्वेषी जातिव्यवस्थेने अडकवलं आहे. जिथे १०% उच्च जातीतील अल्पसंख्याक ९०% शक्तिशाली पदांवर आहेत. हे आजही सुरू आहे. भारतात जातीय अत्याचार, बहिष्कार आणि धर्म म्हणून हिंदू धर्मातील खोट्या रुढीमुळे वाढल्या आहेत. द्विवेदी यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्यावर सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप केला असून ती जागतिक व्यासपीठावर भारताविरुद्ध द्वेष पसरवत असल्याचे म्हटले आहे.
कोण आहे दिव्या द्विवेदी?
आयआयटी दिल्लीची दिव्या द्विवेदी ही मूळची अलाहाबादची आहे. द्विवेदी यांनी सांगितले, 'जी२० शिखर परिषद ही तुलनेने श्रीमंत देश आणि गरीब देशांची परिषद आहे. जीडीपी हे जगात कुठेही प्रगतीचे एकमेव माप नाही. श्रीमंत देशांमध्येही हवामान बदल आणि उजव्या विचारसरणीच्या राजकारणामुळे गरीबी आहे. गरिबी हा जागतिक चिंतेचा विषय असला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय मंचांनी हे वास्तव स्वीकारले पाहिजे.
'भारतात एकीकडे वंशपरंपरागत हक्क, प्रतिष्ठा आणि समृद्धी आहे आणि दुसरीकडे जन्म, गरिबी आणि जातीच्या आधारावर भेदभाव केला जातो. याकडे लक्ष वेधणे ही माझी मजबुरी आणि बौद्धिक कर्तव्य आहे असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर माझ्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आल्याने आपण त्रस्त आहोत. देशात योग्य बोलण्यावर आक्षेप घेतला जात आहे, याचे मला दुःख आहे असं दिव्या द्विवेदी म्हणाल्या.