Nina Singh First Woman Chief of CISF:दिल्ली मेट्रोसह देशभरातील विमानतळांना सुरक्षा पुरवणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) प्रमुखपदी पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. राजस्थान केडरच्या 1989 बॅचच्या IPS अधिकारी नीना सिंह यांना CISF च्या महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. हे पद मिळविणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अधिकारी आहेत. नीना सिंह पुढील वर्षी 31 जुलै रोजी निवृत्त होईपर्यंत या पदावर कार्यरत राहतील.
बिहारच्या रहिवासी असलेल्या नीना सिंह यांनी पाटणा महिला महाविद्यालय आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवीही मिळवली आहे. नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डुफ्लो यांच्यासोबत त्यांनी दोन शोधनिबंधांचे सहलेखनही केले आहे.
2013 ते 2018 या वर्षात सीबीआयच्या सहसंचालक असताना त्यांनी शीना बोरा हत्या प्रकरण आणि जिया खान आत्महत्या प्रकरण, यांसारख्या हाय-प्रोफाइल केसेसवरही काम केले. 2020 मध्ये त्यांना अति उत्कृष्ठ सेवा पदक प्रदान करण्यात आले. त्यांचे पती रोहित कुमार सिंग हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत, जे सध्या केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव आहेत.