गुजरातच्या उना इथं रामनवमीला प्रक्षोभक भाषण देणाऱ्या काजल हिंदुस्तानीला पोलिसांनी अटक केली आहे. काजल हिंदुस्तानीच्या प्रक्षोभक भाषणामुळे उना इथं धार्मिक दंगल घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. परंतु काजल काही दिवसांपासून फरार होत्या. रविवारी वेरावल पोलीस ठाण्यात काजल यांनी आत्मसर्मपण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
पोलिसांनी काजलला कोर्टात हजर केल्यानंतर तिथे तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. काजल हिंदुस्तानी विश्व हिंदू परिषदेद्वारे आयोजित रामनवमीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. काजल हिंदुस्तानी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर स्वत:ला राष्ट्रवादी भारतीय असं लिहिलं आहे. विहिंपने ३० मार्च रोजी रामनवमीचं औचित्य साधून एका सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत काजल हिंदुस्तानी यांनी भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप आहे. या भाषणानंतर २ दिवसांनी काजल हिंदुस्तानी यांच्याविरोधात प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आली.
१ एप्रिल रोजी उना इथं धार्मिक दंगल पेटली होती. २ दिवस शहरात दगडफेक, जाळपोळ सुरू होती. रात्रीच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. या दंगलीतील गर्दीविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत ८० लोकांवर अटकेची कारवाई केली. काजल हिंदुस्तानी यांच्या भाषणानंतर या धार्मिक दंगली पेटल्याचा आरोप करण्यात आला. या भाषणानंतर शहरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.
कोण आहे काजल हिंदुस्तानी?काजल हिंदुस्तानी स्वतःची ओळख सामाजिक कार्यकर्त्या, राष्ट्रवादी, उद्योजक आणि संशोधक म्हणून करते. सोशल मीडियावर खूप सक्रिय असणारी काजलची प्रतिमा उजव्या विचारसरणीची आहे. ती ट्विटर, फेसबुकवर तिचे व्हिडिओ पोस्ट करत असते, ज्यामध्ये ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना दिसते. त्याचबरोबर काजलचे सोशल मीडियावर ९२००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. काजल विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसते.