राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर आता एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पलटवार केला आहे. मुस्लिमांना धर्माचे पालन करण्याची परवानगी देणारे मोहन भागवत कोण? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. याच बरोबर, 'हिंदुस्तानने हिंदुस्तानच रहायला हवे, सहमत. पण ‘माणसानेही माणूस रहायला हवे,’ अशा शब्दाद राज्यसभा खासदार कपील सिब्बल यांनीही सरसंघचालकांवर निशाणा साधला आहे.
ओवेसी म्हणाले, 'मुस्लिमांना भारतात राहण्याची अथवा आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देणारे मोहन भागवत कोण? अल्लाहच्या इच्छेमुळेच आम्ही भारतीय आहोत. आमच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची त्यांची हिंमत कशी केली. आम्ही आमची श्रद्धा सामावून घेण्यासाठी अथवा नागपुरातील काही कथित ब्रह्मचाऱ्यांच्या समूहाला खुश करण्यासाठी नाही.'
काय म्हणाले होते मोहन भागवत? - हिंदुस्थान हा हिंदुस्थानच राहिला पाहिजे, हे सत्य आहे. परंतु, भारतात राहणाऱ्या मुस्लिम समाजाला येथे कोणताही धोका नाही. मुस्लिम बांधवांनी मनात कोणतीही भीती ठेऊ नये. भारतात इस्लामला कोणताही धोका नाही. मात्र, मुस्लिम बांधवांनी आपल्या श्रेष्ठत्वाशी संबंधित विधाने करणे सोडायला हवे, असा सल्ला मोहन भागवत यांनी दिला. आपण एकत्र राहू शकत नाही, हे नरेटिव्ह मुस्लिम समाजाने सोडून द्यायला हवे. खरे तर इथे राहणार्या प्रत्येकाने असा विचार एकत्र नांदण्याचाच विचार केला पाहिजे. मग तो हिंदू असो वा कम्युनिस्ट असो, असे मोहन भागवत म्हणाले.
जे दीर्घकाळापासून लढत आहेत त्यांनी आक्रमक होणे स्वाभाविक -जगभरातील हिंदूंमध्ये एक प्रकारची आक्रमकता दिसून येत आहे. कारण १ हजार वर्षांपासून सतत युद्धात असलेल्या या समाजात एक जागरुकता आली आहे. तुम्ही पाहिले असेल की हिंदू समाज १ हजारे वर्षे युद्धाच्या छायेत राहिला. हा लढा परकीय आक्रमणे, परकीय प्रभाव आणि परकीय कारस्थानाविरुद्ध चालला. या लढ्याला संघाने पाठिंबा दिला. इतर लोकांनीही पाठिंबा दिला. या कारणांमुळे हिंदू समाज जागृत झाला आहे. तसेच जे दीर्घकाळापासून लढत आहेत त्यांनी आक्रमक होणे स्वाभाविक आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले आहे.