नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या पूजा शुक्ला यांना लखनऊ उत्तर मतदारसंघातून समाजवादी पार्टीने उमेदवारी दिली आहे. या जागेवरून ब्राह्मणांचा झेंडा हाती घेतलेल्या अभिषेक मिश्रा यांचे तिकीट कापून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पूजा शुक्ला यांना तिकीट दिले आहे. ही जागा सध्या भाजपाच्या ताब्यात असली तरी येथील राजकीय समीकरण पाहता ही लढत खूपच चुरशीची होऊ शकते.
लखनऊ विद्यापीठातील डाव्या संघटनेतून विद्यार्थी नेत्या म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या पूजा शुक्ला यांना समाजवादी पार्टीने लखनऊच्या उत्तरेकडील मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. 2017 मध्ये भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर पूजा शुक्ला यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लखनऊ विद्यापीठात जाताना काळे झेंडे दाखवले होते, त्यामुळे तिला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. पूजा शुक्ला यांना 26 दिवस तुरुंगात राहावे लागले.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊ विद्यापीठात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार होते. त्यावेळी हसनगंज, लखनऊ विद्यापीठाआधी हनुमान सेतू मंदिराजवळ पोलीस स्टेशनसमोर समाजवादी पार्टीच्या विद्यार्थी सभेच्या नेत्या पूजा शुक्ला यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी काळे झेंडे दाखवले होते. यादरम्यान 12 विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले होते. त्यानंतर बऱ्याच संघर्षानंतर त्यांना जामीन मिळाला होता.
पूजा शुक्ला यांना झेंडा दाखवणे त्यावेळी चांगलेच महागात पडले होते. लखनऊ विद्यापीठाचे नवीन सत्र सुरू असताना पूजा शुक्ला यांना अर्ज रद्द करावा लागला होता. त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे पूजा शुक्ला यांनी लखनऊ विद्यापीठात तब्बल दोन महिने संप पुकारला होता. सध्या त्या समाजवादी विद्यार्थी सभेच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. सरकारच्या धोरणांबाबत पूजा शुक्ला सतत आंदोलन करत असून यादरम्यान अनेकवेळा पोलिसांच्या लाठीचार्जमध्येही त्यांना दुखापत झाली आहे.
सात टप्प्यात विधानसभा निवडणूकदरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.