नवी दिल्ली - २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी विरोधा पक्षांनी आतापासून कंबर कसली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदासाठी आपल्या आवडीच्या ३ उमेदवारांची नावं सांगितली आहेत. इतर तीन नेत्यांची नावं सांगत अखिलेश यादव यांनी स्वत:ला पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाजूला केले आहे. तसेच सध्यातरी आपलं लक्ष हे उत्तर प्रदेशवर राहील, असं अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं आहे. अखिलेश यादव यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नावांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पसंती दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाले आहे. नितीश कुमार यांच्या सत्तांतराच्या राजकारणावर अखिलेश यादव यांनी २०१७ मध्ये जोरदार टीका केली होती. मात्र आता नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पारडे बदलून आरजेडी आणि काँग्रेससोबत पुन्हा एकदा महाआघाडी केली आहे.
दुसरीकडे काँग्रेस मात्र २०२४ ची लोकसभेची निवडणूक राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, असं स्पष्टपणे सांगत आहे. अशा परिस्थितीत आरजेडी काँग्रेसची साथ सोडणार नाही. जर राहुल गांधी यांनी स्वत:ला पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाजूला केलं तर नितीश कुमार यांचा नंबर लागू शकतो.
जर राहुल गांधी यांनी स्वत:ला पंतप्रधानपदाच्या शर्यतीमधून बाजूला केलं तर शरद पवार, केसीआर आणि ममता बॅनर्जी या तिघामधील कोण काँग्रेसला पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून मान्य होईल, हे पाहावे लागेल. काँग्रेसच्या सहमतीशिवाय कुठलाही उमेदवार हा २०२४ मध्ये भाजपाला सर्वशक्तिनिशी आव्हान देऊ शकणार नाही.