कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? आमच्यात वाद नको! काँग्रेस आमदार एका ओळीचा प्रस्ताव संमत करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 03:52 PM2023-05-13T15:52:32+5:302023-05-13T15:57:05+5:30
2013 मध्ये सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री पदी कोणालाच नेमले नव्हते. कारण...
कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्रातील भाजपाने केलेले राजकारण पाहता यावेळी कर्नाटकात काँग्रेस कमालीची सावध झालेली आहे. आमदारांना रातोरात बंगळुरुला हलविण्यासाठी चार्टर्ड प्लेन तयार ठेवण्यात आली आहेत. अशातच उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री कोण असावा, मंत्री कोण असतील आदीवर चर्चा केली जाणार आहे.
निवडणूक आयोगानुसार काँग्रेस १३७ पैकी १०१ जागांवर आघाडीवर तर ३६ जागा जिंकली आहे. भाजपा ४५ जागांवर आघाडीवर असून १७ जागा जिंकल्या आहेत. कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी ११३ जागांची आवश्यकता आहे. यामुळे २-४ जागा कमी अधिक झाल्या तरी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. काँग्रेसमध्ये तसे दोन गट आहेत. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्याच स्पर्धा असते. यामुळे मुख्यमंत्री कोण होणार यावरून पुन्हा मध्य प्रदेश, राजस्थानसारखे राजकारण व्हायला नको म्हणून आमदारांनीच सावध भूमिका घेण्याचे ठरविले आहे.
उद्याच्या बैठकीत एका ओळीचा प्रस्ताव पास करून मुख्यमंत्री कोण असणार याची निवड हायकमांडनेच करण्याचे निश्चित करण्यात येणार असल्याचे समजते. २०१३ मध्ये सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री नेमला नव्हता. यावेळी दुसऱ्या गोटात धुसफुस होती. २०१८ मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा कोणालाच बहुमत मिळाले नव्हते. यामुळे जेडीएससोबत काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. तेव्हा शिवकुमार यांनी आमदारांना सांभाळण्याची भूमिका पार पाडली होती. जेव्हा सरकार कोसळले तेव्हा देखील त्यांनीच संकटमोचकाची भूमिका पार पाडली होती.
शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यामुळे या दोन्ही हेवीवेट नेत्यांमधून एकाची निवड करणे हायकमांडला जड जाणार आहे. शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद दिले तर प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाची निवड करायची याचाही पेच असणार आहे. शिवाय आणखी वर्षभराने लोकसभेची निवडणूक येऊ घातली आहे. काँग्रेसने आमदारांचे मत जाणण्यासाठी दिल्लीतून निरीक्षक पाठविले आहेत. शिवाय काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे देखील याच राज्याचे आहेत. यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा तिढा काँग्रेसला सोडविणे कठीण जाणार आहे.