महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 05:09 AM2024-11-29T05:09:20+5:302024-11-29T05:10:22+5:30
देवेंद्र फडणवीसांची अजित पवार गटाच्या नेत्यांसाेबत, शिंदे यांची पक्ष खासदारांशी चर्चा, रात्री उशिरापर्यंत गृहमंत्री शाह यांच्याकडे बैठकींचा सिलसिला
चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील महायुती सरकारचा मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडविण्यासाठी दिल्लीत जोरदार खलबते सुरू आहेत. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांची गुरुवारी रात्री गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सुमारे अडीच तास चर्चा चालली. काेणाला किती व काेणती मंत्रिपदे मिळणार, यावर चर्चा झाल्याचे कळते. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री १२ वाजता संपली. या बैठकीला शाह यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते.
फडणवीस-अजित पवार चर्चा
त्यापूर्वी फडणवीस आणि अजित पवार यांनी पवार यांच्या निवासस्थानी दीड तास चर्चा केली. शाह यांच्यासमोर मांडावयाच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील अजित पवार गटाच्या आमदारांना मंत्रिपदाची जास्त संधी दिली जाईल, असे समजते.
‘लाडका भाऊ’ ओळख सर्व पदांपेक्षा मोठी : शिंदे
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ‘लाडका भाऊ’ ही माझी ओळख सर्व पदांपेक्षा मोठी आहे. हे वक्तव्य करून त्यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडत असल्याचे पुन्हा एकदा संकेत दिले.
काय काय घडल्या घडामोडी?
अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल बुधवारीच दिल्लीत आले होते. अजित पवार गुरुवारी सकाळी आले. संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे खासदार सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे हेदेखील दिल्लीतच आहेत. बैठकीचा अजेंडा ठरविण्यासाठी अजित पवारांनी पटेल आणि तटकरे यांच्यासह काही नेत्यांशी चर्चा केली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत उदय सामंत आणि शंभूराज देसाई हेही दिल्लीत आले आहेत. शिंदे यांनी देखील शाह यांच्याकडे बैठकीला जाण्यापूर्वी शिवसेनेच्या खासदारांशी सल्ला मसलत केली.
नड्डा यांची शाह यांच्याशी चर्चा
फडणवीस व शिंदे यांच्याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील सत्ता स्थापना आणि त्यातील भाजपची भूमिका यावर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
२ डिसेंबरला शपथविधी!
महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी २ डिसेंबरला होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. स्थान ठरलेले नाही. मात्र बीकेसी मैदानाचा पर्याय आहे. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक एक-दाेन दिवसांत मुंबईत होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नवीन नेता निवडण्यात येईल. त्यानंतर सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व अतिविशिष्ट व्यक्ती समारंभाला उपस्थित राहतील. वानखेडे स्टेडियम येथे समारंभ होण्याची शक्यता होती. मात्र, सुरक्षिततेचा विचार करता अन्य स्थळाचा शोध सुरू आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी वानखेडेवरच झाला. ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो लोक चैत्यभूमीवर येतात. शिवाजी पार्कवर मोठी तयारी केली जाते. तेथे समारंभ झाला तर महापरिनिर्वाण दिनाची तयारी लवकर सुरू करता येणार नाही.
मुहूर्तावर शपथविधी : ३० नोव्हेंबरला अमावस्या आहे. एक तारखेला सकाळी ११ पर्यंत ती राहणार आहे. मुहूर्त म्हणूनही २ डिसेंबरला पसंती आहे.