संजय शर्मानवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स रविवारी संपणार आहे. विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन नवीन नेत्याचे नाव निवडले जाईल. तीन राज्यांमध्ये रविवारपर्यंत मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित होईल.
भाजपने तिन्ही राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. राजस्थानमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यसभा सदस्य सरोज पांडे व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष के. लक्ष्मण व भाजप राष्ट्रीय सचिव आशा लाकडा निरीक्षक असतील. छत्तीसगडमध्ये केंद्रीयमंत्री अर्जुन मुंडा, सर्वानंद सोनोवाल व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम यांची नियुक्ती केली आहे.
मिझोराम मुख्यमंत्रिपदी लालदुहोमा विराजमानआयझॉल : झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) नेते ७३ वर्षीय लालदुहोमा यांनी शुक्रवारी मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल हरी बाबू कंभामपती यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झेडपीएमच्या अन्य ११ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) नेते लालदुहोमा यांनी मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभेत मुख्यमंत्र्यांसह १२ मंत्री असू शकतात. के. सपडांगा यांना गृहमंत्री बनवण्यात आले तर लालरिनपुई या मिझोराममधील पहिल्या महिला कॅबिनेटमंत्री बनल्या.
शिवराज सिंह चौहान यांचा पत्ता कट?राजस्थानमध्ये वसुंधरा राजे वगळता इतर सर्व नेत्यांना दावेदार मानले जात आहे. गजेंद्र सिंह शेखावत, ओम माथूर यांच्यापासून ओम बिरला आणि अर्जुन मेघवाल यांच्यापर्यंत नावांची चर्चा होत आहे. तिन्ही राज्यांत शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे व रमण सिंह यांच्याकडे सूत्रे दिली जाणार नाहीत, एवढे मात्र नक्की समजले जात आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांना संधी?मध्य प्रदेशात मुख्यमंत्री पदासाठी निर्णय झालेला नाही. नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु मागील २ दिवसांत ज्योतिरादित्य सिंधिया यांची जे. पी. नड्डा यांनी दोन वेळा भेट घेतली. त्यानंतर त्यांचेही नाव चर्चेत आले आहे.
छत्तीसगडमध्ये आदिवासी मुख्यमंत्री?छत्तीसगडमध्ये दोन आदिवासी महिलांची नावे समोर येत आहेत. यात केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या रेणुका सिंह व लता उसेंडी यांच्या नावाची चर्चा आहे. या राज्यात भाजप नेतृत्व आदिवासी महिलेला मुख्यमंत्री करू शकते. तसेच दोन उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात.