राहुल गांधी आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्यात जबरदस्त वाकयुद्ध सुरू आहे. आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी गुरुवारी एक धक्कादायक दावा केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत 'बॉडी डबल'चा वापर करत आहेत, असे सरमा यांनी म्हटले आहे.
एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत सरमा म्हणाले, माजी काँग्रेसाध्यक्ष कूपमध्ये बसतात, यात केवळ आठ लोकांची जागा आहे. तर त्यांचा 'बॉडी डबल' बससमोर बसून लोकांकडे बघत हात दाखवतो. सीएम सरमा म्हणाले, 'बससमोर जे राहुल गांधी सर्वांना दिसतात ते खरे राहुल गांधी नाहीत.'
ते पुढे म्हणाले, ‘राहुल त्या कूपेमध्ये बसतात, त्यात केवळ आठ लोकांचीच राहण्याची जागा आहे. हा बॉडी डबल दूरून राहूल गांधी वाटतो आणि लोकांचे म्हणणे आहे की, तो राहुल गांधींसाठी पाई पदयात्रा करतो. तर राहुल गांधी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत चहा आणि नाश्त्याचा आनंद घेतात.’
कोण आहे राहुल गांधी यांचा ‘बॉडी डबल’? -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘बॉडी डबल’चे अथवा डुप्लीकेटचे नाव आहे राकेश कुशवाह. ग्रे दाढी आणि पांढऱ्या टी-शर्टवर राकेश कुशवाह राहुल गांधींप्रमाणेच दिसतात. मध्य प्रदेशातील भोपाळमधील राकेश हे, 14 जानेवारीला मणिपूरमधील इंफाळपासून सुरू करण्यात आलेल्या राहुल गांधींच्या न्याय यात्रेत सहभागी झाले आहेत.