२०२४ मध्ये पंतप्रधानपदासाठी मोदींविरोधातील चेहरा कोण? विरोधी पक्ष आखताहेत अशी रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:48 PM2023-06-14T22:48:35+5:302023-06-14T22:49:32+5:30
2024 Lok Sabha Election: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपली रणनीती आखत आहेत. भाजपा आणि मित्रपक्षांकडून सत्तेत कायम राहण्याचा दावा करण्यात येत आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपली रणनीती आखत आहेत. भाजपा आणि मित्रपक्षांकडून सत्तेत कायम राहण्याचा दावा करण्यात येत आहे. तर विरोधी पक्ष भाजपाला सत्तेतून पायउतार करण्याचा दावा करत आहेत. यादरम्यान, विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यासाठीचा मेगाप्लॅन समोर आला आहे. २३ जूनला पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीपूर्वी त्याबाबतची माहिती समोर येत आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार २३ जून रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत कुठलीही चर्चा होणार नाही. तर २०२४ च्या निवडणुकीसाठी अजेंडा निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाईल. जेडीयू आणि आरजेडी हे बिहारमधील दोन प्रमुख पक्ष या बैठकीचं आयोजन करणार आहेत. यामध्ये काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, समाजवादी पार्टी आणि इतर विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
आरजेडीमधील सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत कुठलीही चर्चा होणार नाही. ही बैठक हे पहिलं पाऊल असेल. त्यात एक संयुक्त अजेंडा तयार केला जाईल. आज महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. सरकारची आर्थिक बेशिस्त, चुकीचा जीएसटी, नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच सांप्रदायिक सौहार्द, सरकारी एजन्सींचा गैरवापर, लोकशाहीला कमकुवत करणे हे मुद्देही महत्त्वाचे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार या बैठकीमध्ये किमान समान कार्यक्र सादर करू शकतात. मात्र पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत कुठलीही चर्चा होणार नाही. ज्येष्ठ नेत्यांची एक टीम स्थापन करण्याबाबत चर्चा होऊ शकते. ही टीम विविध राज्यांमध्ये जाऊन तिथे विरोधी पक्षांचा पाठिंबा मागणार आहे.