बंगळुरू : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचे कथित अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले, असा प्रश्न निर्माण झाला असताना रेवण्णा यांचा माजी कार चालक कार्तिक आणि भाजप नेते जी. देवराजे गौडा यांनी एकमेकांवर हे व्हिडीओ लिक केल्याचा आरोप केला आहे.
प्रज्ज्वल हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुतण्या आहेत. या प्रकरणी जेडीएसने मंगळवारी प्रज्ज्वल यांना चौकशी सुरू असेपर्यंत निलंबित केले. सोशल मीडियावर व्हिडीओ संदेशात चालकाने सांगितले की, एक वर्षापासून आपण रेवण्णांसोबत नाही. आपला आणि कुटुंबाचा छळ झाल्यामुळे आपण नोकरी सोडली. न्यायासाठी आपण जी. देवराजे गौडा यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान, रेवण्णा यांनी मला कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यापासून रोखण्यासाठी स्थगिती आदेश आणला होता. देवराजे गौडा यांनी मला फोटो आणि व्हिडीओ सोपवण्यास सांगितले जे त्यांनी न्यायाधीशांना देण्याचे आश्वासन दिले होते.
भाजप महिलांचा अपमान सहन करणार नाही : शाह
■ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारीरेवण्णा यांच्या कथित लैंगिक शोषणाचा निषेध केला आणि भाजप महिलांचा कोणताही अपमान सहन करणार नाही असे स्पष्ट केले.
■ "कर्नाटकात कोणाचे सरकार आहे? मग रेवण्णांवर आजपर्यंत कारवाई का केली नाही?," असे शाह म्हणाले. दरम्यान, राजद नेते तेजस्वी यादव यांनी भाजप दोषींना पाठीशी घालत आहे, असा आरोप केला.