नवी दिल्ली- कंदाहार विमान अपहरणामुळे भारतात मसूद अझहर हा दहशतवादी प्रसिद्ध झाला. इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या IC 814 विमानाचं 24 डिसेंबर 1999 रोजी अपहरण झालं होतं. त्या विमानातील प्रवाशांची सुटका करण्यासाठी भारतानं तीन दहशतवाद्यांना मुक्त केलं होतं. विमानातील 178 प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांनी मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक झरगार या तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. त्याच्या एक वर्षानंतरच जम्मू-काश्मीर विधानसभेच्या इमारतीत विस्फोटकांनी भरलेलं वाहन घुसवून हल्ला करण्यात आला होता. त्यावेळीही मसूद अझहरचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींनी मसूद अझहरच्या भारत प्रत्यार्पणाची मागणी केली होती. परंतु तसं झालं नाही. 1994ला जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरला अटक केल्यानंतर त्यानं पाकिस्तानमधल्या दक्षिणपंथी कट्टर धार्मिक संघटनासंदर्भात बरीच माहिती दिली होती. मसूद म्हणाला होता की, अफगाणिस्तान, जम्मू-काश्मीर आणि दुसऱ्या भागात पाठवण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांना मदरशांमध्ये ट्रेनिंग दिलं जातं.13 ऑक्टोबर 2001ला प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहवालात मसूद अझहरच्या चौकशीसंदर्भातील माहिती उघड करण्यात आली होती. पत्रकार प्रवीण स्वामी यांनी हा रिपोर्ट मिळवला होता. या रिपोर्टमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात जास्त खतरनाक दहशतवादी संघटना असल्याचं मसूदनं सांगितलं होतं, ही माहिती चौकशीदरम्यान स्वतः मसूद अझहरनं दिली होती. मसूद अझहरनं भारतात पहिल्यांदा गुजराती असल्याचं सांगत प्रवेश केला होता. त्यावेळी पोलिसांना त्याच्यावर एवढा संशय आला नव्हता, असंही या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.मसूद अझहर म्हणाला होता, मी 10 जुलै 1968मध्ये बहावलपूर येथे जन्माला आलो. माझे वडील बहावलपूरमधल्या सरकारी शाळेत हेडमास्टर होते. मला पाच भाऊ आणि सहा बहिणी होत्या. माझ्या वडिलांनी देवबंदमध्ये शिक्षण घेतलं होतं. ते खूपच धार्मिक होते. माझ्या वडिलांचे मित्र मुफ्ती सईद कराचीच्या बिनौरी मशिदीच्या जामिया इस्लामियामध्ये शिकवत होते. मी 1989मध्ये अलमियाची परीक्षा उत्तीर्ण केली. असा बनला मसूद अझहर दहशतवादीमसूद अझहरनं सांगितलं की, जामिया इस्लामियातील बऱ्यापैकी विद्यार्थी हे हरकत-उल-मुजाहिदीन (HuM)च्या नेत्यांच्या प्रभावाखाली होते. मी अफगाणिस्तानातल्या त्यांच्या जिहादच्या कामानं प्रभावित झालो. जामिया इस्लामियामध्ये पाकिस्तान्यांशिवाय अरब देश, सूडान आणि बांगलादेशातील लोकही सामील होते. ते सर्वच देवबंदच्या विचारधारेनं प्रभावित होते. मी माझी 40 दिवसांची ट्रेनिंग पूर्ण केली नव्हीत. तेव्हाच रहमान-उर-रहमाननं मला हरकत-उल-मुजाहिदीन (HuM)चं मासिक सुरू करण्यास सांगितले आणि ऑगस्ट 1989मध्ये सदा-ए-मुजाहिद नावाचं एक मासिक मी काढलं.या मासिकाच्या माध्यमातून मी दहशतवादाचा प्रसार करण्यास सुरुवात केली. मसूद अझहर म्हणाला, जवळपास मी 2 हजार प्रती त्या मासिकाच्या छापत होतो. त्यातील जास्त करून प्रती या शुक्रवारी नमाज पठण करण्यात येणाऱ्या सभांमध्ये मोफत वाटल्या जात होत्या. या प्रतींमध्ये अफगाणिस्तानातील हालचाली, नव्या जागांची माहिती छापण्यात येत होती. यात कराची, हैदराबाद, लाहोर, गुजरांवाला आणि इस्लामाबाद सारख्या शहरांचा समावेश होता. त्यानंतर त्यानं दहशतवादाचा मार्ग अवलंबला.
गुजराती असल्याचं सांगत भारतात घुसला होता मसूद अझहर, पोलीस चौकशीत केले होते खळबळजनक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 3:12 PM