नवी दिल्ली : इसिसचा म्होरक्या कुख्यात दहशतवादी अबू बकर अल बगदादी मारला गेल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. अबू बक्र अल बगदादी नेमका होता कोण? त्याचा आतापर्यंतचा प्रवास होता तरी कसा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता शोधली जात आहेत.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका टष्ट्वीटनंतर बगदादीबाबतचे वृत्त व्हायरल झाले. उत्तर पश्चिम सिरियात बगदादीविरुद्ध केलेल्या कारवाईत तो मारला गेल्याचे सांगण्यात आले. न्यूजवीक आणि सीएनएनचा असा रिपोर्ट आहे की, या हल्ल्याचे टार्गेट बगदादी हाच होता. या वृत्तात असेही म्हटले आहे की, हे आॅपेरशन सुरू असताना त्याने आपल्याजवळील स्फोटकांचा स्फोट करीत स्वत:ला उडविले. अमेरिकेसाठी आणि जागतिक दहशतवादविरोधी अभियानासाठी हे एक मोठे यश मानले जात आहे. अमेरिकेच्या जवानांनी ओसामा बिन लादेन यास पाकिस्तानमध्ये २ मे २०११ रोजी मारले होते.
इसिसचा बगदादी हा जगातील वाँटेड व्यक्तींमध्ये वरच्या क्रमांकावर होता. आठ वर्षांपूर्वी अमेरिकेने त्याला अतिरेकी घोषित केले होते. त्याच्यावर ७० कोटी रुपयांचे इनामही घोषित केले होते. अबू बगदादी अखेरचा केव्हा दिसला? इसिसच्या मीडिया विंगने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत तो जुलै २०१४ मध्ये एकदाच दिसला होता. मोसूलच्या ज्या अल नूरी मशिदीत बगदादी दिसला होता, त्यावर २०१७ मध्ये इराकच्या सुरक्षा दलाने कब्जा केला. यावर्षी एप्रिलमध्ये तो पाच वर्षांनंतर पहिल्यांदा एका व्हिडिओत दिसला होता. बगदादीच्या नेतृत्वात इसिसने आपले जाळे अनेक ठिकाणी पसरविलेले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील हे मोठे यश आहे.इस्लामिक धर्मशास्त्रात डॉक्टरेटबगदादीचे मूळ नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बद्री. मध्य इराकच्या समारा शहरात २८ जुलै १९७१ रोजी एका अत्यंत धार्मिक वृत्तीच्या सुन्नी मुस्लिम कुटुंबात तो जन्माला आला. इस्लामिक धर्मशास्त्रात त्याने डॉक्टरेट केले होते. अबू मुसाब अल-झरकावी या म्होरक्याने त्याला दहशतवादी संघटनेत सामील करून घेतले होते. अमेरिकेच्या हल्ल्यात झरकावी ठार झाल्यानंतर बगदादीकडे इसिसची सूत्रे आली होती आणि त्यानंतर अनेक देशांमध्ये या संघटनेने धुमाकूळ माजवायला सुरुवात केली.