अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल अहमदाबाद (Ahmedabad) येथे जागतिक पाटीदार समाजाच्या सरदार धामचे उद्घाटन केले. त्यावेळी कोणालाही माहिती नव्हती की शनिवारी गुजरातच्या (Gujarat) राजकारणात मोठा बदल होईल. ज्यावेळी भाजपाचे संघटन मंत्री बी एल संतोष गांधीनगर येथे पोहोचले आणि त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि राज्य प्रभारी रत्नाकर यांची भेट घेतली. त्यावेळी सर्वांना वाटले की, भाजपाने विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार केली आहे. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत भेट घेतली. त्यावेळीही अनेकांना मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे वाटत होते. पण, मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी शनिवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. अशा वेळी सत्ताबदलाबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विजय रुपानी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळणे शक्य नाही, हे स्पष्ट दिसत होते. तसेच, त्यांना गुजरातमधील कोरोना स्थिती नीट हाताळता आली नाही. या तीन महत्वाच्या कारणांमुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रुपानी यांना हटविण्यात आले, अशी शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.
आनंदीबेन पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून हटविल्याने पटेल समुदाय नाराज झाला होता. विजय रुपानी यांची ऑगस्ट २०१६मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. मात्र २०२२ साली गुजरातच्या विधानसभा निवडणुका भाजपा विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली लढणार नाही, हे काही प्रसंगांतून लक्षात आले होते. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी सी. आर. पाटील यांची जुलै २०२० मध्ये निवड हा पहिला संकेत होता. सी. आर. पाटील हे नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते.
आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठकविजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी गुजरात भाजपा विधिमंडळ पक्षाची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे. भाजपाचे राज्य प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केंद्रीय निरीक्षकांसह विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात. काही केंद्रीय मंत्री गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचेही सांगितले जाते.
रुपानी यांच्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण होणार? भावी मुख्यमंत्री म्हणून विद्यमान केंद्रीय अरोग्यमंत्री मनसुख मांडवीय व उपमुख्यमंत्री नितीन पटेल, विद्यमान मंत्री आर. सी. फालदू, दादरा-नगरहवेली, लक्षव्दीपचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांची नावे शर्यतीत आहेत. मनसुख मांडवीय यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै महिन्यात केंद्रीय आरोग्यमंत्री केले. राज्यसभेचे दोनदा सदस्य राहिलेल्या मनसुख मांडवीय यांना २०१२च्या विधानसभा निवडणुकांत भाजपाने उमेदवारी नाकारली होती. २००७ साली ते विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने जिंकले होते. मांडवीय हे पटेल समाजातील आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर परीक्षा घेऊनच त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आहे. मनसुख मांडवीय हे वादग्रस्त नसलेले, साधे राहणीमान असलेले नेते आहेत. त्यांचे नाव कोणत्याही उद्योगसमुहाशी जोडले गेलेले नाही.