नवी दिल्ली - 17 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी एनडीएकडून भाजपाच्या कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची निवड केली आहे. ओम बिर्ला यांची निवड करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्चर्याचा धक्का दिल्याचं बोललं जातं आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी एस. एस. अहलुवालिया, मेनका गांधी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मोदींनी या नावांना धक्का देत ओम बिर्ला यांची निवड केली आहे. ओम बिर्ला बुधवारी लोकसभा अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारतील.
कोण आहेत ओम बिर्ला?
- ओम बिर्ला यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1962 रोजी झाला आहे.
- बिर्ला यांनी मास्टर ऑफ कॉमर्स ही पदवी घेतली आहे.
- ओम बिर्ला यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कॉलेजमध्ये विद्यार्थी युनियनमधून केली
- भारतीय जनता युवा मोर्चाचे ते राजस्थानमधील अध्यक्ष होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर ते उपाध्यक्ष झाले.
- 2003 मध्ये पहिल्यांदा ओम बिर्ला कोटा दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
- कोटा दक्षिण मतदारसंघातून ते 3 वेळा आमदार राहिले होते.
- सध्या कोटा मतदारसंघातून खासदार म्हणून ते निवडून आले आहेत
- ओम बिर्ला यांना पत्नी, दोन मुली असं कुटुंब आहे.
लोकसभा अध्यक्ष म्हणून खासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती झाल्यानंतर ओम बिर्ला यांच्या पत्नी अमिता बिर्ला यांनी याबद्दल संसदीय कॅबिनेटचे आभारही मानले आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना, ओम बिर्ला यांची लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल आम्ही मंत्रिमंडळाचे मनापासून धन्यवाद मानतो, असे अमिता यांनी म्हटले आहे.