वाराणसी - पंतप्रधाननरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वाराणसीचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी अन्नपूर्णा शुक्ला यांचे चरण स्पर्श केले. अन्नपूर्णा देवींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी वाराणसीमध्ये भव्य रोडशो केला. या रोड शोला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर, मोदींनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी, मोदींनी मदन मोहन मालविया यांच्या मानस कन्या अन्नपूर्णा देवींना वाकून नमस्कार केला. अन्नपूर्णा शुक्ला या बनारस महिला विश्वविद्यालयाच्या (बीएचयु) प्राचार्य होत्या. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण बनारस विद्यापीठातूनच पूर्ण केले आहे. अन्नपूर्णा देवी या मालवीय यांचे आशीर्वाद मिळालेल्या एकमेव जिवंत माजी प्राचार्य आहेत. त्यामुळेच त्यांना मालविय यांच्या मानस पुत्री मानले जाते. या वयातही अन्नपूर्णा शुक्ला आपल्या सामाजिक कार्यात सहभागी होतात. लहुराबीर येथील काशी अनाथालय संस्था वनिता पॉलिटेक्निकच्या त्या निर्देशिका आहेत.
सन 1921 मध्ये बीएचयूमध्ये महिला महाविद्यालयाची सुरुवात झाली. त्यावेळी, अन्नपूर्णा शुक्ला यांनी गृहविज्ञानचे महत्त्व लक्षात घेऊन, महाविद्यालयात गृह विज्ञान शिक्षण विभागाची सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांना 15 वर्षे मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यामुळेच गृह विज्ञान विभागाच्या पहिल्या विभागप्रमुखही त्याच बनल्या होत्या. दरम्यान, मोदींनी वाराणसीतून आपला अर्ज दाखल केल्यानंतर स्वराज यांनी मोदींच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. वाराणसी येथील जनता केवळ खासदार निवडणार नसून देशाचा पंतप्रधान निवडणार आहे. त्यामुळे वाराणसीची जनता भाग्यवान असल्याचे मत केंद्रीयमंत्री मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले. मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना एनडीएचे एकाप्रकारे शक्तीप्रदर्शनच सुरू होते. त्यामुळेच, महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही हजेरी लावली होती.