सध्या राहुल गांधी यांच्या भाषणाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्या सभागृतील भाषणांचेही कौतुक होत आहे. खरे तर विरोधीपक्ष नेता म्हणून निवड झाल्यानंतर, ते अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधीपक्षनेता झाल्यापासून त्यांची जबाबदारीही वाढली आहे. त्यांना अनेक विध मुद्यांवर विरोधी पक्षांची भूमिका मांडावी लागत आहे. यातच आता, इकोनॉमिक्स टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात राहुल गांधी यांच्या टीमसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ही टीम पडद्यामागून राहुल गांधी यांची जबाबदारी सांभाळते...
राहुल गांधी यांची टीम... -मल्लिकार्जुन खर्गे - मल्लिकार्जुन खर्गे सध्या काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी I.N.D.I.A. च्या स्थापनेतही त्यांची महत्वाची भूमिका होती. ते संसदेच्या अधिवेशनादरम्यान आपल्या टीमच्या मदतीने विरोधी पक्षांच्या रणनीतीला अंतिम रूप देतात.
अलंकार सवाई -आयसीआयसीआय बँकेचे माजी कर्मचारी अलंकार सवाई गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधींसोबत काम करत आहेत. ते गांधींचे डोळे आणि कान आहेत. राहुल गांधींची भेट घेण्यासाठी शेवटची परवानगी यांचीच घ्यावी लागते.
कौशल विद्यार्थी -बिहारचे ऑक्सफर्ड ग्रॅज्युएट कौशल विद्यार्थी हे राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. ते 2019 मध्ये राहुल गांधी यांचे आधिकृत खाजगी सचिव होते. ते प्रामुख्याने संसदेच्या अधिवेशन काळात अथवा प्रवासादरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत दिसतात. ते राहुल गांधी आणि इतर राजकीय नेत्यांमधील दुवा आहेत. कौशल विद्यार्थीच राहुल गांधी यांचे भाषण तयार करतात.
केबी बायजू -माजी एसपीजी अधिकारी केबी बायजू यांनी 2010 मध्ये नोकरी सोडली आणि यानंतर ते राहुल गांधी यांच्या टीममध्ये सामील झाले. बायजू राहुल गांधीच्या संपूर्ण लॉजिस्टिक आणि प्रवासाचे प्लॅनिंग करतात. तेच राहुल गांधींच्या दौऱ्यांचेही प्लॅनिंग करतात.
बी श्रीवत्स -बी श्रीवत्स हे राहुल गांधी यांच्या सोशल मीडियाचे काम बघतात. राहुल गांधीनी सोशल मीडियावर काय लिहावे, यासंदर्भात बी श्रीवत्स हेच सुचवतात. ते 2021 मध्ये गांधींच्या टीम में सहभागी झाले होते.
मनिकम टागोर -मनिकम हे तामिळनाडूतून तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू असून, त्यांना दक्षिण भारतातील इनपुट्स देतात.
सॅम पित्रोदा -इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा, हे अनेक दशकांपासून गांधी कुटुंबाच्या जवळचे आहेत. लोकसभा निवडणूक काळात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ते पुन्हा अध्यक्षपदी आले आहेत. ते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचे प्लॅनिंग करतात.
या शिवाय, या यादीत, केसी वेणुगोपाल, सुनील कनुगोलू, गौरव गोगोई यांचाही समावेश आहे.