नवी दिल्ली : सध्याची तीन वर्षांची कारकिर्द सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर पुन्हा त्याच पदावर नियुक्त होण्यात आपल्याला स्वारस्य नाही, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी शनिवारी स्पष्ट केल्यानंतर आता त्यांचे उत्तराधकारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजन यांच्या जागी रिझर्व्ह बँकेतीलच कोणाची वर्णी लागते की बाहेरची कोणी व्यक्ती त्या खुर्चीवर बसते हा आता नव्या अटकळींचा विषय झाला आहे.कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नेमून केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर नेमण्याची प्रक्रिया सुरु केली असून राजन यांच्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.डॉ. राजन यांच्यानंतर गव्हर्नरपदासाठी अनेक नावे सरकारपुढे असून त्यात सात स्पर्धक आघाडीवर आहेत, असे संकेत वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्याने वित्तीय बाजार व व्यापर-उद्योग क्षेत्रात त्यापैकी कोणाची निवड होईल किंवा होणे योग्य ठरेल यावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र बाजारात ज्यांच्या नावांची अटकळ बांधली जात होती ते शशिकांत दास व अरविंद सुब्रह्मण्यम हे वित्त मंत्रालयाचे दोन ज्येष्ठ अधिकारी गव्हर्नरपदाच्या स्पर्धेत नाहीत, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ज्या इच्छुक स्पर्धकांची नावे आघाडीवर आहेत त्यांत विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिरी, उर्जित पडेल, अरुंधती भट्टाचार्य, सुबीर गोकर्ण व अशोक चावला यांचा समावेश आहे. यापैकी पटेल हे सध्या रिझर्व्ह बँकेचे चारपैकी एक डेप्युटी गव्हर्नर आहेत व गेल्या जानेवारीतच त्यांची त्या पदावर तीन वर्षांसाठी फेरनियुक्ती झाली आहे. अरुंधती भट्टाचार्य या स्टेट बँक आॅफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या व्यापारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. राकेश मोहन पूर्वी दोन वेळा रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर व केंद्र सरकारमध्ये आर्थिक बाबींविषयक विभागाचे सचिव राहिलेले आहेत. विजय केळकर हेही केंद्रीय वित्त सचिव होते व वित्तीय सुधारणांसंबंधीच्या अनेक महत्वाच्या समित्यांचेही ते अध्यक्ष होते. इतरांनी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत महत्वाची पदे सांभाळलेली आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राजन यांचा उत्तराधिकारी कोण?
By admin | Published: June 20, 2016 5:19 AM