नवी दिल्ली - राज्यसभा उपसभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार हरिवंश यांनी बाजी मारली. संयुक्त जनता दल पक्षाचे नेते असलेले हरिवंश नारायण सिंह यांचा गरीब शेतकऱ्याचा मुलगा, बँक अधिकारी, पत्रकार ते राज्यसभा उपसभापती पदापर्यंतचा प्रवास हा अनेक चढउतारांनी भरलेला आणि अनेकांना प्रेरणा देणार आहे. हरिवंश नारायण सिंह यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. हरिवंश नारायण सिंह हे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे गाव असलेल्या सिताब दियारा गावातील रहिवासी आहेत. हरिवंश यांच्या लहानपणी त्यांच्या कुटुंबाने आपली शेती गंगा नदीच्या प्रवाहामुळे गमावली होती. जिद्दीने शिक्षण पूर्ण करून अर्थशास्त्र विषय घेऊन पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एक हिंदी वृत्तपत्र धर्मयुगमधून पत्रकारितेस सुरुवात केली. त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये सरकारी अधिकारी म्हणून काही काळ काम करून ते पुन्हा एकदा पत्रकारितेत आले. 1989 मध्ये त्यांनी रांची येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक प्रभात खबर वृत्तपत्रात नोकरी सुरू केली. पुढे ते या वृत्तपत्राचे संपादक देखील झाले. 2014 साली जेडीयूकडून राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी संपादकपदाचा राजीनामा दिला. राज्यसभा सदस्य बनण्यापूर्वी हरिवंश यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिले होते. चंद्रशेखर यांचे सल्लागार म्हणून काम पाहण्यासाठी त्यांनी प्रभात खबर या वृत्तपत्रातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र चंद्रशेखर यांचे सरकार पडल्यानंतर ते पुन्हा एकदा याच वृत्तपत्रात रुजू झाले होते. साधेपणाने जीवन व्यतित करणारे हरिवंश हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचेन निकटवर्तीय मानले जातात. मात्र त्यांनी आपले संबंध कधीही सार्वजनिक होऊ दिले नाहीत. नितीश कुमार यांची राज्यात चांगली प्रतिमा निर्माण करण्यामध्ये हरिवंश यांचा हात असल्याचे म्हटले जाते. हरिवंश यांच्या राज्यसभा उपसभापतीपदी झालेल्या नियुक्तीमुळे भाजपा आणि जेडीयूमधील संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हरिवंश यांनी खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेसाठी बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील बहुआरा गाव दत्तक घेतले होते. तसेच त्यांच्या खासदार निधीमधील मोठी रक्कम बिहारमधील आर्यभट्ट ज्ञान विश्वविद्यालयाती संशोधनावर खर्च होतो.
गरीब शेतकऱ्याचा मुलगा, बँक अधिकारी, पत्रकार ते राज्यसभेचे उपाध्यक्ष... कोण आहेत हरिवंश?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 1:23 PM