नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला ८२ जागा मिळाल्या होत्या. इतक्या जागांनी मुख्यमंत्री व पालकमंत्रिपदही मिळत नाही. ते मिळवायचे असेल तर किमान १४५ जागा जिंकाव्या लागतात. तेवढ्या जिंकल्या असत्या तर आज कोणाची गरजही नव्हती; परंतु तशी परिस्थिती नाही म्हणून आघाडीचे बोलणे महाराष्ट्र हितासाठी चालू आहे. अशा परिस्थितीत स्वबळावर लढण्याची व मित्रपक्षाच्या विरोधात बोलण्याची वेळ नाही, असा सल्ला कॉँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी दिल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या प्रचार शुभारंभप्रसंगी राणे यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमक्ष आपली भावना बोलून दाखविली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध बंड पुकारून थेट उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेणारे राणे यांना दिल्लीश्रेष्ठींनी कॉँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुखपद देऊन शांत केले असले, तरी त्यामागे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राणे यांनी पक्षाला अपेक्षित यश मिळवून दिले तर मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन श्रेष्ठींनी दिल्याचा दावा राणे समर्थक करीत आहेत. त्यातूनच या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी कायम राहावी यासाठी राणे प्रयत्नशील असून, दोन्ही कॉँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले तर आघाडीचे सरकार येऊ शकते व मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळू शकते, असा राणे यांचा होरा आहे. (प्रतिनिधी)
राणेंचा रोख कोणाकडे?
By admin | Published: September 26, 2014 2:30 AM