काँग्रेसनं राजस्थानात कुणाच्या चेहऱ्यावर लढवायला हवी निवडणूक? सर्व्हेतून पायलट यांना मोठा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 08:03 PM2023-07-27T20:03:51+5:302023-07-27T20:08:14+5:30
खरे तर राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या समेट घडवून आणल्यानंतर, गुज्जर समुदायाला आकर्षित करणे, हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे.
राजस्थानात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. येथे या दोन्ही पक्षांत काट्याची टक्कर बघायला मिळेल असे बोलले जात आहे. मात्र या दोन्ही पक्षांनी अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मात्र यातच, एबीपी न्यूजने सी-व्होटरच्या साधीने एक सर्व्हे केला आहे. यात, काँग्रेसने सीएम पदासाठी कुणाचा चेहरा प्रोजेक्ट करायला हवा? असा प्रश्न विचारला. तर जाणून घेऊयात लोकांनी काय दिलं उत्तर?
या सर्व्हेने सर्वांनाच चकित केले आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेतील 41 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, अशोग गेहलोत हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असायला हवेत. तर 30 टक्के लोकांनी सचिन पायलट यांना पसंती दिली आहे. यातही विशेष म्हणजे, तब्बल 23 टक्के लोकांनी दोहोंपैकी कुणालाही समर्थन दिले नाही. तर 6 टक्के लोकांनी उत्तर माहीत नाही असे सांगितले.
खरे तर राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या समेट घडवून आणल्यानंतर, गुज्जर समुदायाला आकर्षित करणे, हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असणार आहे. हायकमांडसोबत झालेल्या गेहलोत आणि पायलट यांच्या बैठकीनंतर, दोघांमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्यासंदर्भात दावे केले जात आहेत. नुकतेच काँग्रेसने राजस्थानात होणाऱ्या विधानसभा नुवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक समितीची घोषणा केली होती.
काँग्रेसने, मुख्यमत्री गेहलोत यांचे सर्वात जास्त विश्वासू नेते गोविंद सिंह डोटासरा यांना या समितीचे अध्यक्ष बनवले आहे. तर सचिन पायलट आणि त्यांच्या 4 सहकाऱ्यांनाही या समितीत स्थान देण्यात आले आहे.