बंगळुरु - कर्नाटकात सध्या होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष्य आहे. कर्नाटकात प्रत्येक दिवशी काही ना काही राजकीय नाट्य घडत आहे. या संपूर्ण घडामोडीत कर्नाटकातील जनतेसमोर एक प्रश्न उभा राहिला आहे की, जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा आमदारांवर केला जाणारा खर्च कुठून येत आहे? तिन्ही राजकीय पक्षाच्या आमदारांची उठाठेव आणि अलिशान हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च जवळपास कोट्यावधीच्या घरात आहे.
मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठी त्यांना अज्ञात ठिकाणी तसेच अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. हे आमदार चार्टड प्लेनमधून मुंबई आणि बंगळुरु प्रवास करत आहेत. तसेच सुप्रीम कोर्टात सुरु असणाऱ्या सुनावणीसाठी वकीलांची फौज तयार आहे त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त आमदारांना आपल्या पक्षात ठेवण्यासाठी हा खर्च केला जात आहे. एका आमदारावर जवळपास 20 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. बंगळुरु आणि मुंबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये या आमदारांना ठेवलं गेलं तिथे त्यांच्या राहण्याची सोय ज्या हॉटेलमध्ये केली आहे तेथील दिवसाचा खर्च 4 हजार रुपयांपासून 11 हजार रुपयांपर्यंत आहे. तर बंगळुरु, मुंबईमधील विशेष विमानाचा खर्च 4 लाख रुपये प्रति प्रवास आहे.
काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, आमदारांनासोबत ठेवण्यासाठी प्रत्येक पक्षाने कमीत कमी आतापर्यंत 50 लाख रुपये खर्च केले आहेत. त्यासोबत या आमदारांना महाराष्ट्रातील शिर्डी मंदिरात जाण्यासाठी विशेष विमान बुक केलं गेलं. तर दुसरीकडे या अफाट खर्चामागे काँग्रेस-जेडीएसने भाजपावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. मात्र वास्तविक परिस्थिती पाहता हा सगळा पैसा कोण खर्च करतोय हे कोणालाही माहिती नाही. जर भाजपा हा खर्च करत नसेल तर बंडखोर आमदारांना त्यांच्या सोयीप्रमाणे विशेष विमानं कशी मिळत आहेत? असा सवाल काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
कर्नाटकातील ही राजकीय परिस्थिती पहिल्यांदा नाही. याआधी 14 महिन्यांमध्ये 3 वेळा जेडीएस, काँग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षांनी आपल्या आमदारांना आलिशान हॉटेलमध्ये ठेवलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही अशाचप्रकारे आमदारांना एकत्रितपणे मुंबई, गोव्याला पाठविण्यात आलं होतं.