चेन्नई : तामिळनाडूतील डीएमकेचे नेते एम. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पक्षाचा उत्तराधिकारी कोण होणार यावर दोन भावांमध्ये सत्ता संघर्ष सुरु झाला आहे.
करुणानिधी यांचा मोठा मुलगा एम. के. अलगिरी यांनी आज, सोमवारी करुणानिधींच्या समाधीस्थळावर जाऊन डीएमकेचे सच्चे कार्यकर्ते, नेते आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. अलगिरी यांची काही वर्षांपूर्वीच पक्षातून हकालपट्टी केली गेली होती. तर त्यांचे छोटे बंधू स्टॅलिन यांना खुद्द करुणानिधी यांनीच वर्षभरापूर्वी कार्यकारी अध्यक्ष बनविले होते.
आता अलगिरी यांनी स्वत:ला करुणानिधी यांचा राजकीय वारसदार असल्याचे घोषित केले आहे. यापूर्वी त्यांनी स्टॅलिन यांना कार्यकारी अध्यक्ष बनविण्यावरही प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे पुढील काही दिवसात डीएमकेमध्ये मोठा सत्तासंघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे डीएमकेची उद्या, मंगळवारी महत्वाची बैठक होणार आहे.
या पार्श्वभुमीवर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले अलगिरी यांना पुन्हा सन्मानाने पक्षात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पक्षात ज्या काही घडामोडी घडल्या, त्याचे आपल्याला वाईट वाटते, असे अलगिरी यांनी सांगितले आहे. त्यांच्या समर्थनार्थ सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ पसरविले जात आहेत. तसेच ठिकठिकाणी झळकलेल्या फलकांमध्येही अलगिरी यांनाच भविष्यातील नेत्याच्या रुपात दाखविण्यात येत आहे. यातच डीएमकेचे नेते अलगिरी यांच्या बाबत काहीही बोलण्याचे टाळत आहेत.
डीएमकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, उद्या पक्षाच्या कार्यकारिणीची सभा बोलावण्यात आली आहे. त्यांच्याकडे भविष्यात पक्षातील पदांबाबत निर्णय घेण्यासाठी 80 दिवसांचा कालावधी आहे.
का झाली होती हकालपट्टी?अलगिरी यांनी 2014 मध्ये भाजपचे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि तामिळनाडुच्या एमडीएमके पक्षाचे नेते वायको याची भेट घेतली होती. यावर करुणानिधी प्रचंड नाराज झाले होते. यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यावेळी अलगिरी यांनी सांगितले होते की , आता घरी पोटभरून जेवन करणार आहे.