शीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण? दिल्ली काँग्रेससमोर यक्षप्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 04:04 PM2019-07-22T16:04:32+5:302019-07-22T16:06:51+5:30
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाची मोठी हानी झाली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाची मोठी हानी झाली आहे. सोबतच दिल्लीमध्ये शीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण? असा यक्षप्रश्न काँग्रेसमोर पडला आहे.
अजय माकन यांच्या राजीनाम्यानंतर शीला दीक्षित यांनी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती. काही दिवसांपूर्वीच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीतील एकही जागा जिंकता आली नव्हती. तसेच स्वत: शीला दीक्षित यांनाही पराभूत व्हावे लागले होते. मात्र असे असले तरी दिल्लीत काँग्रेसला तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आणण्यात त्यांना यश मिळाले होते. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र शीला दीक्षित यांच्या अचानक जाण्यामुळे दिल्ली काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वाचे संकट निर्माण झाले आहे.
शीला दीक्षित या दिल्ली काँग्रेसच्या सर्वात विश्वसनीय चेहरा होत्या. काँग्रेसच्या कठीण काळात गांधी कुटुंबाला त्यांच्या सल्ल्याची सर्वाधिक गरज असतानाच शीला दीक्षित यांचे निधन झाले. दिल्लीमधील काँग्रेससुद्धा दिल्लीत आपला गमावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी त्यांच्याच नेतृत्वाखाली प्रयत्न करत होती. आता शीला दीक्षित यांच्या जाण्यानंतर दिल्ली काँग्रेसचे नेतृत्व कुणाकडे सोपवले जाईल, या प्रश्नाचे उत्तर ना काँग्रेसकडे आहे. राजकीय जाणकारांकडे आहे.