नवी दिल्ली: देशभरात कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती दिवसेंदिवस चांगल्या पद्धतीने सुधारत असल्याचे पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत आहे. तसेच मृत्यूदरही कमी होताना दिसत आहे. मात्र, देशात अद्यापही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा कायम आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. यातच कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या Covaxin लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) हिरवा कंदील मिळालेला नाही. येत्या २६ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.
भारतात आताच्या घडीला सीरम इन्स्टिट्यूटची Covishield, भारत बायोटेकची Covaxin, रशियाची स्फुटनिक तसेच एक डोस पुरेशी असलेली जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. भारताखेरीज अन्य देशांमध्ये कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात यावी, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, WHO कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढील बैठकीकडे भारताचे लक्ष लागले आहे.
Covaxin च्या आपत्कालीन मंजुरीबाबत विचार
WHO च्या प्रमुख शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंत्रज्ञ सल्लागारांची एक महत्त्वाची बैठक २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या बैठकीत Covaxin कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन मंजुरीबाबत विचार केला जाऊ शकतो. WHO ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारत बायोटेकसोबत काम सुरू असल्याचे स्वामीनाथन यांनी सांगितले. तसेच आपत्कालीन मंजुरी मिळालेल्या कोरोना प्रतिबंधक लसींचा व्यापक पोर्टफोलियो आणि शक्य त्या सर्व ठिकाणी त्याची उपलब्धता करून विस्तार करणे, हेच WHO चे मुख्य लक्ष्य असल्याचे स्वामीनाथन यांनी नमूद केले.
दरम्यान, Covaxin सातत्याने लसीबाबतचा डेटा उपलब्ध करून देत असल्याचे WHO ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. सध्या Covaxin लसीच्या आपत्कालीन वापरासंदर्भात समीक्षा सुरू असून, ही लस सर्व मानकांवर सिद्ध होते की नाही, यावर भर दिला जात आहे. भारत बायोटेकने इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ वायरोलॉजी यांच्यासोबर Covaxin कोरोना लसीची निर्मिती केली आहे.