नवी दिल्ली – जगाला शौचालयाचं महत्त्व समजून सांगणारे आणि कोट्यवधी लोकांचे जगणं सोप्पे करणारे सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी जगाचा निरोप घेतला. देशातील प्रत्येक शहरात आपण जे सुलभ शौचालय पाहतोय त्यात बिंदेश्वर पाठक यांचेच योगदान आहे. सुलभ शौचालयाला इंटरनॅशनल ब्रँड त्यांनी बनवले. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका गावात १२ एप्रिल १९४३ रोजी पाठक यांचा जन्म झाला.
बिंदेश्वर पाठक अशा घरात वाढले जिथं ९ खोल्या होत्या. परंतु एकही शौचालय नव्हते. घरातील महिला सकाळी लवकर उठून बाहेर शेतावर जात. दिवसभर शौचास जाणे कठीण व्हायचे. त्यामुळे अनेक समस्या आणि आजार मागे लागायचे. हे चित्र बिंदेश्वर पाठक यांना अस्वस्थ करायचे. या समस्येवर तोडगा काढायचा असं त्यांनी ठरवलं. स्वच्छता क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचे ध्येय त्यांनी बाळगलं आणि देशात एक मोठा बदल घडला.
बिहार आणि उत्तर प्रदेशात पाठक यांनी शिक्षण घेतले होते. बनारस हिंदू विद्यापीठातून समाज शास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर पटना विद्यापीठात मास्टर्स आणि पीएचडी पूर्ण केली. १९६८-६९ मध्ये बिहारमध्ये गांधी जन्म शताब्दी सोहळ्यात त्यांनी काम केले. या समितीत त्यांनी स्वस्त शौचालय तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम केले. त्याकाळी एका उच्च जातीतील पदवीधर मुलाने शौचालय क्षेत्रात काम करणे सोपे नव्हते. परंतु ते ध्येयापासून मागे हटले नाहीत.
देश शौचमुक्त करण्याच्या दिशेने ते काम करत होते. त्यामुळे त्यांचे वडील नाराज झाले. पाठक यांचे सासरेही शौचालयाच्या कामाने रागात होते. तुझा चेहरा पुन्हा कधी दाखवू नको असं सासऱ्यांनी जावयाला म्हटलं. माझ्या मुलीचे आयुष्य खराब केले. इतके शाब्दिक बाण बिंदेश्वर पाठक यांनी झेलले तरी गांधीजी स्वप्न साकार करतोय असं ते म्हणायचे.
१९७० मध्ये बिंदेश्वर पाठक यांनी सुलभ इंटरनॅशनलची स्थापना केली. ही एक सामाजिक संघटना होती. सुलभ इंटरनॅशनलने २ खड्ड्यांचे फ्लॅश टॉयलेट विकसित केले. डिस्पोजल कम्पोस्ट शौचालयाचा अविष्कार त्यांनी केला. हे काम त्यांनी इतक्या कमी खर्चात आसपास मिळणाऱ्या सामानातून केले. त्यानंतर देशभरात सुलभ शौचालय बनवण्यास सुरूवात केली. पाठक यांच्या कामगिरीने भारतात त्यांना पद्धभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.