नवी दिल्ली - नागिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे प्रकरण सध्या तापले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांचाही समावेश होता, असा दावा एका व्हायरल फोटोच्या माध्यमातून करण्यात येत होता. मात्र दिल्ली पोलिसांनी या फोटोबाबत खुलासा केला आहे. साध्या वेशामध्ये हेल्मेट आणि जॅकेट परिधान केलेला तो तरुण संघाचा स्वयंसेवक नव्हे तर दिल्ली पोलीस दलातील एएटीएसचा कॉन्स्टेबल असल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर जाळपोळ आणि हिंसाचाराचे प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांसोबत पोलिसांच्या वेशात एबीव्हीपीचे कार्यकर्तेही घुसल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. त्यातच पोलिसांमध्ये साध्या वेशात असलेला एक तरुण हा एबीव्हीपीचा कार्यकर्ता भारत शर्मा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे हा हिंसाचार कुणी भडकवला याचीही चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक फोटो शेअर केला होता. देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली असून संपूर्ण देशात जयभीमची घोषणाबाजी होत आहे. पण, सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचे काम भाजपाकडून होत आहे. रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईला केवळ लोकशाहीला वाचवायची आहे, त्यासाठीच ते रस्त्यावर उतरले आहेत. देशातील विद्यार्थी एकत्र आले आहेत, त्याचीच भिती भाजपाला वाटत आहे. पण, विद्यार्थ्यांचे आंदोलन जेव्हा एकत्र येते, तेव्हा सत्तातर होते, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला होता.मात्र दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा दावा फेटाळून लावला आहे. हा तरुण एबीव्हीपी आणि संघाचा कार्यकर्ता नव्हे तर दिल्ली पोलिसांच्या अँटी ऑटो थिप स्कॉडचा (AATS) कॉन्स्टेबल असल्याचे स्पष्टीकरण एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहे. तसेच छायाचित्रात दिसलेल्या पोलिसाचा आणि भारत शर्मा नावाचा काही संबंध नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली पोलिसांकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावरून संबंधित छायाचित्रे हटवण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक केलेल्या व्यक्तींमध्ये एकही विद्यार्थी नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, अटक केलेल्या 10 लोकांपैकी 3 जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
पोलिसांसोबत असलेला तो तरुण संघाचा स्वयंसेवक नव्हताच, तर... जाणून घ्या व्हायरल सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 6:07 PM