मुंबई- कर्तबगार आणि डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून हिमांशू रॉय ओळखले जात होते. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये हिमांशू रॉय यांनी शिक्षण पूर्ण केलं. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचमधील आयपीएस अधिकारी होते. चार वर्ष त्यांनी मुंबई क्राईम ब्रॅन्चमध्ये काम केलं. महाराष्ट्र एटीएस प्रमुख पदावर असताना ते जास्त चर्चेत आले. गुन्हे विभागामध्ये काम करताना सगळ्यांना जपणारा, सहकाऱ्यांना मोकळिक देणारा व बॉडी बिल्डर ऑफिसर अशी हिमांशू रॉय यांची ओळख होती. फिट राहण्यासाठी अत्यंत मेहनत रॉय घ्यायचेस परंतु दुर्दैवानं त्यांना दुर्धर आजार झाला होता. हिमांशू रॉय हे हनुमानाचे निस्सीम भक्त होते.
हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाइल प्रकरणं हाताळली. 2013मध्ये घडलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी विंदू दारा सिंह यांना अटक करण्यामाहे हिमांशू रॉय यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. पत्रकार जे डे हत्या प्रकरणातील तपासात हिमांशू रॉय यांचा मोठा वाटा होता. याशिवाय अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीही हिमांशू रॉय यांच्याच नेतृत्त्वात झाली होती.
हिमांशू रॉय यांनी पोलीस प्रशासनात आल्यापासून अनेक ठिकाणी कर्तव्य बजावलं आहे. 1995 मध्ये नाशिक (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. नाशिकचे आर्थिक गुन्हे विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. पोलीस उपायुक्त वाहतूक, पोलीस उपायुक्त झोन-१ मध्येही काम केलं. नाशिक शहर पोलीस आयुक्त (२००४-२००७) पदावर कार्यरत होते. 2009 साली मुंबईत पोलीस सहआयुक्त पदावर काम केलं. हिमांशू रॉय यांनी सायबर सेलमध्येही काम केलं. राज्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक पद त्यांनी सांभाळलं.