नवी दिल्ली : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाची घोषणा काँग्रेसकडून केल्यानंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटला नसून यासंदर्भात उद्या निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटवरवरुन छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत या चार दिग्गज नेत्यांसोबत आपला फोटो शेअर केला आहे. त्यामुळे असे लक्षात येते की, या चारपैकी कोणीतरी एकजण राज्याचा पुढील मुख्यमंत्री असणार आहे.
दरम्यान, रायपूरमध्ये रविवारी दुपारी 12 वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांनी दिली आहे.