नंदकिशोर पुरोहितलोकमत न्यूज नेटवर्कसोमनाथ : गिर-सोमनाथ जिल्ह्यात हिंदुत्वावर जातीय समीकरण नेहमीच वरचढ ठरत आले आहे. २०१७ मध्ये भाजपला जिल्ह्यातील सोमनाथ, तलाला, कोडीनार व उनामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी भाजपच्या विरोधात जातीचा मुद्दा चालला होता. आता पक्षाने जातींच्या समीकरणाचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत, सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.
येथे केवळ दोन वेळा विद्यमान आमदार निवडून आलेत. १९६७ मध्ये केसर दोडिया स्वतंत्र पार्टीकडून विजयी झाले, तर तेच १९७२ मध्ये काँग्रेसकडून विजयी झाले होते. १९९० आणि १९९५ मध्ये जसूभाई बराड यांनी बाजी मारली होती. १९९८ मध्ये ते पराभूत झाले. २००२ मध्ये काँग्रेसच्या मार्फत त्यांनी विधानसभेत वापसी केली होती, परंतु २००७ मध्ये ते पराभूत झाले. २०१२ मध्ये ते चौथ्यांदा विजयी झाले व २०१७ मध्ये त्यांना विमल चुडासमा (काँग्रेस) यांनी पराभूत केले.
यावेळी मैदानात कोण?कोडिनार जागेवरून (अनुसूचित जाती आरक्षित) काँग्रेसने नवीन उमेदवार महेश मकवाणा यांना तिकीट दिले. मागील वेळी काँग्रेसकडून मोहनलाल वाला विजयी झाले होते. ही जागा काँग्रेसने २२ वर्षांनी २०१७ मध्ये भाजपकडून हिसकावली. १९९५ पासून भाजप विजयी होत आला होता. आता उमेदवार बदलून डॉ.प्रद्युम्न वाजा यांना संधी दिली. आपकडून वलजीभाई मकवाणा मैदानात आहेत.
सोमनाथ आणि भाजपसोमनाथ येथूनच १९९० च्या दशकात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रथयात्रेवर निघाले होते व देशात भाजपने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. अशा स्थितीत गुजरातच्या राजकारणात सोमनाथचे नाव येताच, भाजपच्या आजवरच्या प्रवासातील याच्या योगदानाची भूमिका स्पष्ट होते.
मुस्लीम महिलांचेही प्रतिनिधित्वएका मुस्लीम महिलेलाही सोमनाथ मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. १९७५ मध्ये शेख अवासा बेगम साहब मोहंमद अली यांनी जनसंघाचे हमीरसिंह दोडिया यांना पराभूत केले होते.
२.६७ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात कोळी, मुस्लीम व अहीर समुदाय एखाद्या उमेदवाराचा विजय किंवा पराभव यात प्रमुख भूमिका निभावतात, शिवाय ९ टक्के अनुसूचित जाती व दोन टक्के अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे.