Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस जिंकली तर मुख्यमंत्री कोण होणार? डीके शिवकुमार यांनी दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 04:07 PM2023-05-06T16:07:23+5:302023-05-06T16:08:13+5:30
कर्नाटकातील जनता काँग्रेसला साथ देऊन संपूर्ण देशाला संदेश देईल, असे डीके शिवकुमार म्हणाले.
कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 140 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार (DK Shivkumar) यांनी केला. तसेच, पक्ष जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल, असेही त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल सांगितले. कर्नाटकातील विजयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मार्ग मोकळा होईल. कर्नाटकातील जनता काँग्रेसला साथ देऊन संपूर्ण देशाला संदेश देईल, असे डीके शिवकुमार म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकात काँग्रेस विजयी स्थितीत आहे. मात्र, यावेळीही माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. डीके शिवकुमार म्हणाले की, "माझ्यासाठी पक्ष आधी येतो आणि मुख्यमंत्रीपद नंतर येते. मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर पक्ष जो काही निर्णय घेईल, तो त्यांना मान्य असणार आहे. कर्नाटक काँग्रेसमधील मतभेदाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. कर्नाटकातील काँग्रेस नेतृत्व एकसंध आहे, हे सत्य आहे. कार्यकर्ते सक्रिय आहेत. काँग्रेसला बहुमत मिळावे यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करत आहोत."
डीके शिवकुमार यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेस कर्नाटकात मेहनत घेत आहे. कर्नाटकात 'भारत जोडो यात्रा' यशस्वी झाली. या निवडणुकीत काँग्रेसला 141 जागा मिळतील आणि भाजप 60 जागांच्या खाली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, कर्नाटकची निवडणूक आम्ही अगदी आरामात जिंकू. 1978 मध्ये देशात जनता पक्षाची सत्ता असताना, त्यावेळीही कर्नाटकने काँग्रेसचा लोकसभेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला होता. पुन्हा एकदा कर्नाटक तशीच भूमिका बजावणार आहे, असे डीके शिवकुमार म्हणाले.
डीके शिवकुमार यांचा गंभीर आरोप
याचबरोबर, भाजप सरकार आमच्या तरुणांना नोकऱ्या देऊ शकले नाही, असा आरोप डीके शिवकुमार यांनी केला. भाजप जनतेला महागाईतून दिलासा देऊ शकली नाही. आता ते चिथावणीखोर गोष्टी बोलून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने दिलेल्या यूसीसी आणि एनआरसीच्या आश्वासनांबाबत ते म्हणाले की, कर्नाटक निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढवली जात आहे. या निवडणुकीत भाजपला कोणतेही भाषण करण्यात अपयश आले आहे.