नवी दिल्ली : भाजपाची दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आल्यानंतर आज सायंकाळी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या शपथ सोहळ्याला बॉलिवूड, खेळ आणि उद्योगजगतातील बड्या हस्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. याचबरोबर या शपथ सोहळ्याला तब्बल 8 हजार लोकांना बोलविण्यात आले आहे. हा सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे.
उद्योगजगतातून मुकेश अंबानी, रतन टाटा, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि आनंद महिंद्रा यांना बोलावण्यात आले आहे. याशिवाय आरपीजी ग्रुपचे प्रमुख हर्ष गोएंका आणि गोदरेजचे अध्यक्ष आदि गोदरेज यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचे समजते. मात्र, गोएंका आणि गोदरेज भारतात नसल्याची शक्यता आहे.
क्रीडाजगतातून पीटी ऊषा, पी गोपीचंद यांच्यासह माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड़, अनिल कुंबळे, हरभजन सिंह, सायना नेहवाल आदी उपस्थित राहणार आहेत.