हरीश गुप्ता नवी दिल्ली : सीबीआयच्या नवीन प्रमुखांची निवड करण्यासाठी २४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन.व्ही. रमण आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या उच्चाधिकारी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राकेश अस्थाना (महासंचालक, सीमा सुरक्षा दल आणि अमलीपदार्थ नियंत्रण विभाग) आणि डॉ. वाय.सी. मोदी (महासंचालक, राष्ट्रीय तपास संस्था-एनआयए) या पदाच्या शर्यतीत असून, या पदासाठी उच्चाधिकार समितीकडे १०९ आयपीएस अधिकाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्या संचिका पाठविण्यात आल्या आहेत.
राकेश अस्थाना हे गुजरातच्या १९८४ च्या आयपीएस तुकडीचे, तर वाय.सी. मोदी हे आसाम-मेघालयच्या १९८४ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २००२ च्या गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या विशेष चौकशी पथकात वाय.सी. मोदी यांचा समावेश होता. २०१५ ते १७ दरम्यान वाय.सी. मोदी हे सीबीआयचे अतिरिक्त संचालक होते. २०१७ मध्ये ते एनआयचे महासंचालक झाले. हे दोन्ही अधिकारी एक-दोन महिन्यांत निवृत्त होणार आहेत. २०१९ मध्ये आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यातील संघर्षामुळे सीबीआय अभूतपूर्व वादात सापडली होती.
चर्चेत कोण?महाराष्ट्राचे माजी पोलीसप्रमुख आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, भारत-तिबेट सीमा पोलीसदलाचे प्रमुख एस.एस. देस्वाल, उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एच.सी. अवस्थी, केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा आणि गुजरातच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने (एसीबी) प्रमुख केशव कुमार यांचाही यादीत समावेश आहे. केशव कुमार हे पूर्वी सीबीआयमध्ये होते.