नवी दिल्ली : काँग्रेसला आज नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी कोणाचीही निवड करण्यात आली नाही. दरम्यान, आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत नवीन अध्यक्ष पदाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी अनेक काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयात दाखल होत आहे.
राहुल गांधी यांनी 25 मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून ते आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. तसेच, गांधी परिवारातील व्यक्ती किंवा प्रियंका गांधी-वाड्रा सुद्धा काँग्रेसच्या अध्यक्षपदी असणार नाही, असे अनेकदा राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रियंका गांधी यांचे नाव अध्यक्षपदासाठी समोर केल्याचे दिसून आले.
दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीने असे ठरविले आहे की, संपूर्ण देशातील काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी पाच ग्रुप्स (नॉर्थइस्ट, इस्ट, नॉर्थ, वेस्ट आणि साऊथ) यामध्ये विभागणी करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारिणी या 5 ग्रुप्सच्या रिपोर्ट्सवर आज चर्चा करणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे.
आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सध्या सुरु आहे. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदी अनेक नेत्यांची नावे चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, मुकुल वासनिक, सुशिलकुमार शिंदे, ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्याही नावांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, आज सकाळी अकरा वाजता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, ए. के. एन्टोनी, गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम आणि अहमद पटेल यांच्यासारख्या नेत्यांचीही काँग्रेसच्या मुख्यालयात बैठक पार पडली आहे.