लोकसभेला बिहारमध्ये नितीशकुमार सोबतीला आले म्हणून भाजपाने यश मिळविले, नाहीतर एकही जागा आली नसती. यामुळे नितीशकुमारांच्याच नेतृत्वात राज्यातील निवडणूक लढविणार आणि तेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार असे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले होते. याला काही दिवस उलटत नाही तोच भाजपाच्या नेत्याने बिहारचा मुख्यमंत्री कोण, निवडणूक झाल्यानंतर ठरणार असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात सत्तेत राहण्यासाठी नितीशकुमार यांची साथ हवी आहे. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असून सरकारची बहुमताची चाचणी होणे बाकी आहे. अशावेळी नितीशकुमार यांना दुखविणे भाजपाला परवडणारे नाही. नितीशकुमार इंडिया आघाडीची स्थापना करून ऐनवेळी भाजपासोबत आले आणि सगळे वारे फिरले होते. यातच विरोधक नितीशकुमार आणि भाजपात कधी एकदा बिनसते आणि ते बंडखोरी करतात याकडे डोळे लावून आहेत.
या पार्श्वभूमीवर भागलपूरमध्ये भाजपा नेते अश्विनीकुमार चौबे यांनी नितीशकुमार नाराज होतील असे वक्तव्य केले आहे. बिहारमध्ये भाजपाच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार बनावे अशी माझी इच्छा आहे आणि मी ते केंद्रीय नेतृत्वालाही कळविले आहे. पूर्ण बहुमताने भाजपा एकट्याच्या जिवावर सत्तेत यायला हवी. सहकाऱ्यांनाही पुढे घेऊन जावे. यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे, असे चौबे म्हणाले.
मला वाटतेय की आम्ही नितीशकुमारांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. आजही आणि उद्याही पुढे जाऊ. परंतू निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरविला जाईल. पक्ष आणि केंद्रीय नेते हे ठरवतील. परंतू पक्षात आयात माल आम्ही कधीही सहन करणार नाही. यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावर संघटनेचाच मूळ व्यक्ती असायला हवा, असे वक्तव्य चौबे यांनी केले आहे.