Maharashtra Latest News: विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला जनादेश मिळाला. २३० जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाभोवती चर्चेने फेर धरला आहे. एकनाथ शिंदेंनी माघार घेतल्याने भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले; पण नावाची घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी (२७ नोव्हेंबर) रात्री बैठक झाली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. निकाल लागल्यापासून भाजपमध्ये घडामोडींना वेग आला असून, महाराष्ट्रातील सामाजिक समीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित करण्यात विलंब होत असल्याचीही चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बुधवारी रात्री झालेली बैठक तब्बल ४० मिनिटं चालली. महाराष्ट्रात मराठेत्तर मुख्यमंत्री बनवल्यास मराठा समाज नाराजी होण्याची चिंता भाजपला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवले गेले, तर मराठा मतपेढी कशापद्धतीने भाजपसोबत एकसंध ठेवता येईल, यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा आग्रह करण्यात आला. शिवसेनेचे नेते, आमदारांनी तशी इच्छा बोलून दाखवली. मात्र, बुधवारी (२७ नोव्हेंबर) एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला.
भाजपच्या नेत्यांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री बनणार हे स्पष्ट झाले आहे. आता भाजप कोणाला मुख्यमंत्री बनवणार, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.