नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत INDIA आघाडी बनवली आहे. या आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होण्याची शक्यता आहे. याआधी विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा आणि दुसरी बैठक बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती.
मुंबईत विरोधी पक्षांची बैठक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणार होती. परंतु काही नेत्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांनी या बैठकीत उपस्थित राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली. सूत्रांनुसार, इंडिया आघाडीची पुढील बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. ३१ ऑगस्टला विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी डिनर आयोजित केले आहे. तर १ सप्टेंबर रोजी सकाळी विविध विषयांवर चर्चा होईल त्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली जाईल.
ही बैठक पवईच्या एका हॉटेलमध्ये होईल. इंडिया आघाडीची बैठक पहिल्यांदाच अशा राज्यात होणार आहे जिथे या आघाडीतील कुठल्याही पक्षाची सत्ता नाही. ही बैठक महाविकास आघाडीकडून आयोजित केली जाईल. ज्यात काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी असेल. मुंबईत होणारी ही बैठक यासाठी महत्त्वाची आहे कारण त्यात आघाडीच्या निमंत्रकांच्या नावावर निर्णय होऊ शकतो. त्याशिवाय एक समन्वय समिती स्थापन केली जाऊ शकते. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत रुपरेषा तयार केली जाऊ शकते. आपापसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
१७-१८ जुलैला बंगळुरूमध्ये झाली होती बैठक
याआधी १७-१८ जुलैला बंगळुरूमध्ये बैठक झाली होती. काँग्रेसनं बोलावलेल्या या बैठकीत २६ पक्षाचे नेते सहभागी होते. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव युपीए बदलून इंडिया असं ठेवण्यात आले. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इंक्लूसिव्ह असा त्याचा अर्थ आहे. ही लढाई विरोधी पक्षविरुद्ध भाजपा नाही तर भाजपाची विचारधारेविरुद्ध आहे. ही विचारधारा देशावर हल्ला करतेय, बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे ही लढाई देशासाठी असल्याने इंडिया नाव ठेवण्यात आले आहे. तसेच INDIA आघाडी नाव ठेवल्यानंतर आता टॅगलाईन जितेगा भारत असं ठेवण्यात आले आहे.