पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची सोमवारी (१७ फेब्रुवारी ) सायंकाळी दिल्लीत बैठक झाली. यानंतर, पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (सीईसी) नावाची शिफारस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली असल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात सूत्रांनी माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदींशिवाय, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे देखील या समितीचा भाग आहेत. माध्यमांनी सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली जाऊ शकते. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मंगळवारी (१८ फेब्रुवारी २०२५) या पदावरून निवृत्त होत आहेत.
काँग्रेसने केली होती बैठक स्थगित करण्याची मागणी -मिळालेल्या माहितीनुसार, "सर्वोच्च न्यायालयात सीईसी नियुक्तीबाबत सुनावणी सुरू आहे. अशा स्थितीत नवीन नियुक्तीचा निर्णय काही दिवस पुढे ढकलण्यात यावा. यात अहंकार असण्यासारखे काही नाही. हीच लोकशाही आणि प्रजासत्ताकाची मागणी आहे, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. समितीची रचना काय असावी, यावर 19 फेब्रुवारीला सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हे पाहता आजची बैठक पुढे ढकलायला हवी होती, असे काँग्रेसचे मत आहे.
यासंदर्भात, काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनीदेखील निवड पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, "निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीत पंतप्रधान, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यासोबतच, सरन्यायाधीशांचा सहभाग असावा. 2 मार्च 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले होते की, सीईसी आणि निवडणूक आयोगाच्या निवडीमध्ये सीजेआय यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. सीईसीची निवड केवळ कार्यकारिणीने करू नये. त्यामुळे आजची ही बैठक काही दिवस पुढे ढकलावी, अशी आमची मागणी आहे."