Next BJP National President: नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींची तिसरी टर्म रविवारपासून सुरु झाली आणि सोमवारपासूनच मोदी सरकार अँक्शन मोडमध्ये आले आहे. आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता मोदी मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकते असे सांगितले जात आहे. या बैठकीत सर्व कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. भाजपाचे मावळते राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना यावेळी मंत्रिपद मिळाले आहे. तसेच शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर या अनुभवी खासदारांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे. अशा वेळी भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.
नवे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवरील बदलांची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड बाकी होती आणि आता जे. पी. नड्डा सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार हे स्पष्टच आहे. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारीत पूर्ण झाला आणि त्यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता नवे अध्यक्ष कोण याबाबत काही नावांची चर्चा आहे.
भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?
नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांचीही नावे चर्चेत होती. पण आता हे दोघेही केंद्रातील एनडीए सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. अशा वेळी, नवा राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर प्रदेशमधील असू शकतो असे बोलले जात आहे. यूपीत भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. याशिवाय सध्या संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या काही नावांचीही या पदासाठी चर्चा आहे.
कोणत्या नावांची चर्चा?
केंद्र सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अनेकांना यावेळी सरकारमध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे संघटनेची जबाबदारी दिली जाऊ शकते. असे झाल्यास माजी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना संधी मिळू शकते. ते यापूर्वी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षही राहिले आहेत. तसेच या पदासाठी सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्राचे असून राष्ट्रीय राजकारणात येण्यापूर्वी ते राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. सध्या ते बिहारचे प्रभारी सरचिटणीस असून लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.