रायपूर- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. जनतेचा कौल 11 डिसेंबरला समजणार आहे. परंतु निकालाच्या पूर्वीच राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय पक्ष विजय आणि पराजय यांची समीकरणं जुळवू लागले आहेत. अशातच राज्यातल्या विधानसभेच्या 90 जागांपैकी काही जागा निर्णायक ठरणार आहेत. ज्या जागा सत्ता मिळवण्यासाठी गरजेच्या आहेत. या जागांवरच्या विजयावरून उमेदवारही साशंक आहेत.छत्तीसगड विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यातील 20 जागा या छत्तीसगडमध्ये सरकार बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सरगुजा, बिलासपूर, दुर्ग आणि रायपूर भागातील 16 आणि बस्तरमधील 4 जागांवरचे निकाल सत्ता स्थापनेसाठी निर्णायक ठरणार आहेत. यंदा भाजपाच्या नेत्यांचा विजय कठीण दिसतोय. दुसरीकडे काँग्रेसनं दिलेले उमेदवार हे मजबूत स्थिती आहेत. तसेच काही जागांवर मायावती-अजित जोगी यांच्या पक्षांची आघाडी वरचष्मा राखण्याची शक्यता आहे. भिलाई नगर- या जागेवर रमण सिंह यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री प्रेम प्रकाश पांडेय आणि काँग्रेसचे तरुण नेते व भिलाईन नगरपालिकेचे महापौर देवेंद्र यादव यांच्यामध्ये मुकाबला आहे. मतदानानंतर या दोन्ही पक्षांतील उमेदवारांना विजयाबाबत खात्री नाही. या जागेवर गेल्या वेळेपेक्षा 4 टक्के अधिक मतदान झालं असून, एकूण 66.96 टक्के मतदान झालं आहे. रायपूर उत्तर - या जागेवर भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी अंतिम वेळेस उमेदवार दिले आहेत. भाजपाकडून विद्यमान आमदार श्रीचंद सुंदरानी आणि काँग्रेसकडून कुलदीप जुनेजा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथे 60.30 टक्के मतदान झालं आहे. रायपूर ग्रामीण- या जागेवरून भाजपाचे नंदकुमार साहू आणि काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांच्यामध्ये सरळ लढत आहे. इथलीही स्थिती अस्पष्टच आहेत. गेल्या वेळी ही जागा काँग्रेसनं जिंकली होती. यंदा या जागेवर गेल्या वेळेच्या तुलनेत 2 टक्क्यांनी वाढलं आहे. यंदा इथे 61.09 टक्के मतदान झालं आहे. रायपूर पश्चिम- या उच्चभ्रू जागेवरून भाजपा सरकारमधील मंत्री राजेश मुणत यांचा सामना काँग्रेसचे युवा नेते विकास उपाध्याय यांच्याशी होणार आहे. विकासनं या जागेवरून भाजपा मंत्री राजेश मुणत यांना कडवं आव्हान दिलं आहे. या जागेवर कमी मतदान झालं असून, 60.45 टक्के नोंदवलं गेलं आहे. वैशाली नगर- दुर्ग जिल्ह्यातील या जागेवरही भाजपा आणि काँग्रेसनं ऐन वेळेला उमेदवारांची घोषणा केली. निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जनतेनं चांगला प्रतिसाद दिला. भाजपाचे विद्यमान आमदार विद्यारतन भसीन आणि काँग्रेसचे बदरुद्दीन कुरैशी यांच्यामध्ये मुकाबला होणार असून, इथे 65.57 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महासमुंद- वर्ष 2013मध्ये जनतेनं अपक्ष उमेदवारी विमल चोपडा यांना निवडून दिलं होतं. यावेळी भाजपानं या जागेवरून पूनम चंद्राकर, तर काँग्रेसनं विनोद चंद्राकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. या जागेवर 8.53 टक्के मतदान झालं आहे. जैजैपूर- वर्षं 2013मध्ये या जागेवरून बसपाचे केशव चंद्रा यांचा विजय झाला होता. यावेळीही बसपानं उमेदवार दिला आहे. परंतु यंदा बसपाच्या उमेदवाराला भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवाराकडून कडवी लढत मिळण्याची शक्यता आहे. यंदा या जागेवर 68.17 टक्के मतदान झालं आहे. बिल्हा- राज्यातील ही जागा उच्चभ्रू आहे. या जागेवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक यांच्या विरोधात काँग्रेसचे सक्रिय नेते राजेंद्र शुक्लाला मैदानात उतरवलं आहे. या जागेवर विद्यमान आमदार आणि अजित जोगींच्या पक्षाचा उमेदवार आमने-सामने आहेत. इथे त्रिशंकू परिस्थिती आहे. सक्ती- या जागेवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री चरणदास महंत काँग्रेसचे उमेदवार आहे. यांच्या विरोधात आमदार मेघाराम साहू भाजपाकडून रिंगणात आहेत. या जागेवर सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तखतपूर- लागोपाठ दोन वेळा भाजपाचा उमेदवार जिंकला होता. यावेळी भाजपानं या जागेवरून महिला आयोगाची अध्यक्षा हर्षिता पांडेय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. या जागेवरून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी सिंह या भाजपाच्या उमेदवाराला टक्कर देत आहे.कोटा- काँग्रेसनं या जागेवरून माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची पत्नी रेणू जोगी यांचा पत्ता कट केला. त्यामुळे रेणू जोगी या जनता काँग्रेस छत्तीसगड पक्षाकडून निवडणूक लढत आहेत. खैरागड- वर्षं 2013मध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार देवव्रत सिंह अजित जोगी यांच्या पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत. या जागेवर भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना विजयाची खात्री नाही. अकलतरा- बसपाचं वर्चस्व असलेल्या या जागेवरून अजित जोगी यांची सून रिचा जोगी मैदानात आहे. भाजपानं या जागेवरून बसपाचे बंडखोर सौरभ सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. गेल्या वर्षी काँग्रेसचे चुन्नी साहू या जागेवरून विजयी झाले होते. यंदा या जागेवर तिरंगी लढत आहे. महासमुंद जिल्ह्यातील बसना, कोरबा जिल्ह्यातील पाली-तानाखार, कोरिया जिल्ह्यातील मनेंद्रगड, सूरजपूरच्या प्रतापपूरसह लोरमी, कांकेरची भानुप्रतापपूर जागेवरही कडवी झुंज आहे. या जागांवर विजय आणि पराजय सत्ता स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
छत्तीसगडमध्ये कोणाचं येणार सरकार, 'या' 20 जागा ठरणार निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 9:56 PM