लोकसभा अध्यक्षपदी कुणाला मिळणार संधी?; रात्री उशिरापर्यंत अमित शाहांच्या घरी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 08:41 AM2024-06-25T08:41:14+5:302024-06-25T08:42:49+5:30

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. सत्ताधारी भाजपा हे पद स्वत:कडे ठेवणार आहे तर उपाध्यक्षपद मित्रपक्षाला देण्याची शक्यता आहे. 

Who will get a chance as Lok Sabha Speaker?; Meeting at Amit Shah house till late night | लोकसभा अध्यक्षपदी कुणाला मिळणार संधी?; रात्री उशिरापर्यंत अमित शाहांच्या घरी बैठक

लोकसभा अध्यक्षपदी कुणाला मिळणार संधी?; रात्री उशिरापर्यंत अमित शाहांच्या घरी बैठक

नवी दिल्ली - लोकसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यात अध्यक्षपदावरून जोरदार चर्चा रंगू लागल्यात. सत्ताधारी एनडीएकडून अद्याप अध्यक्षपदासाठी कुणाच्याही नावाची घोषणा झाली नाही. त्यातच सोमवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठकांचा सिलसिला सुरू होता. पहिली बैठक संध्याकाळी ६ वाजता झाली, तिथे जे.पी.नड्डा उपस्थित होते. ही बैठक जवळपास १ तास चालली. 

त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास जे.पी नड्डा पुन्हा शाह यांच्या घरी पोहचले. तिथे दुसरी बैठक झाली ती अडीच तास चालली. या बैठकीत लोकसभा अध्यक्षपदाच्या नावाची चर्चा झाली. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हंगामी अध्यक्षांच्या नियुक्तीनंतर लोकसभेचे अध्यक्षपद रिक्त झालं. याबाबत लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी केली. २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

बिनविरोध निवड होणार?

सूत्रांनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष सत्ताधारी एनडीएशी तडजोड करायला तयार आहेत फक्त त्यांना १ अट मानावी लागेल. लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला हवंय. जर भाजपाने विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली तर विरोधी पक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरवणार नाही. मात्र भाजपा ही दोन्ही पदे आपल्याकडे ठेवायची तयारी करत आहे. लोकसभेचं अध्यक्षपद भाजपाला दिले जाईल तर उपाध्यक्ष पद भाजपाच्या मित्रपक्षाला मिळेल. उपाध्यक्षपद टीडीपीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परंपरा मोडणार?

मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायचा आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांची सहमती बनणार का हे पाहणे गरजेचे आहे. कारण प्रथा परंपरेनुसार लोकसभेचं अध्यक्षपद सत्ताधाऱ्यांकडे आणि उपाध्यक्षपद विरोधी पक्षाकडे दिलं जाते. भाजपाने उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्याचा कुठलाही नियम नाही असं म्हटलं आहे. याआधीही आघाडी सरकारच्या काळात अध्यक्षपद स्वत:कडे ठेवत उपाध्यक्षपद घटक पक्षांना दिल्याचं घडलं आहे. 

राष्ट्रपती भवनात जेवणाची पंगत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाला भोजनाचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नीही सहभागी होत्या. 
 

Web Title: Who will get a chance as Lok Sabha Speaker?; Meeting at Amit Shah house till late night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.