नवी दिल्ली – सत्ताधारी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर आता कॅबिनेटमधील फेरबदलावर चर्चा होऊ लागली आहे. सोमवारी म्हणजे आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक घेणार आहेत. ही बैठक दिल्लीच्या प्रगती मैदानातील कन्वेंशन सेंटरमध्ये होण्याची अपेक्षा आहे. ज्याठिकाणी सप्टेंबरमध्ये जी २० शिखर संमेलन होणार आहे.
महाराष्ट्रात रविवारी मोठा राजकीय भूकंप घडला. अजित पवारांसह समर्थक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यातील घडामोडीनंतर आता केंद्रातही मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात असं बोलले जात आहे. त्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. पीटीआयनुसार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत बंड पुकारले. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
महाराष्ट्रात अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर आता राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिल्लीत बोलावले जाऊ शकते. परंतु फडणवीसांच्या निकटवर्तीयांच्या मते, ते राज्याच्या राजकारणातच सक्रीय असतील. एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना खासदारांपैकी १ किंवा २ जणांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळू शकते. त्यात राहुल शेवाळे आणि प्रतापराव जाधव यांची नावे आघाडीवर आहेत.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट फेरबदलाबाबत बैठक झाली होती. त्यात अनुराग ठाकूर आणि धर्मेंद्र प्रधान यांना मोठी जबाबदारी मिळेल असं म्हटलं गेले. भाजपा सूत्रांनुसार, जेव्हा पंतप्रधान मोदी कॅबिनेट बदल करतील त्यात सहकारी मित्रपक्षांना स्थान दिले जाईल. २० जुलैपासून संसदेचे मान्सून अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी कॅबिनेट बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. काही राज्यात भाजपाच्या संघटनेतही बदल होऊ शकतो. कारण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार संघटनेत बदलासोबत वरिष्ठ नेत्यांना जबाबदारी देण्याची शक्यता आहे.