गोरखपूर - ज्या मुलीची लग्नाच्या विधी जीन्स पँट घालून करण्याची इच्छा असेल, तिच्याशी कोणताही मुलगा लग्न करणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये महाराणा प्रताप शिक्षा परिषदेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात सत्यपाल सिंह बोलत होते. यावेळी मंचावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही हजर होते. यावेळी त्यांनी मुक्तफळं उधळलीत.
यावेळी बोलताना ते म्हणाले, एखादी व्यक्ती जीन्स घालून मंदिराचा महंत होण्याची भाषा करत असेल तर, लोक त्याला स्वीकारतील का? ही गोष्ट लोकांच्या पचनी पडणार नाही. इतकेच काय एखादी मुलगी स्वत:च्या लग्नातील विधींच्यावेळी जीन्स घालून बसणार असेल तर किती मुलांना अशा मुलीशी लग्न करावेसे वाटेल, असा सवाल सत्यपाल सिंह यांनी विचारला.
दरम्सयान, त्यपाल सिंह 1980 च्या बॅचमधील महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. मुंबई पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिन्यातच त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात जागा मिळाली.